December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : नवलेखकांनो, आपली ताकद दाखवा : पानिपतकार पाटील

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण

कल्याण

शब्दांची ताकद खूप मोठी असून नवलेखकांनी प्रस्तावनेच्या कुबड्या हाती घेण्यापेक्षा आपल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःची ताकद दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ पानिपतकार विश्वास पाटील यांनी आज केले. लेखकांनी टीप कागदाप्रमाणे आपले जीवन टिपण्याची आवश्यकता असून तुम्ही उत्तम लिहिलं तर लोक तुम्हाला शोधत येतील असा विश्वासही पाटील यांनी दिला. सार्वजनिक वाचनालय व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य वितरण सोहळा वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना लेखक विश्वास पाटील यांनी वाचकांशी संवाद साधला.

या सोहळ्यात कवी संजय चौधरी (आतल्या विस्तवाच्या कविता) व कवियत्री योगिनी सातारकर-पांडे (शब्द जायबंदी होण्याचे दिवस) यांना विश्वास पाटील यांच्या हस्ते कवी माधवानुज पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कथालेखक नागेश शेवाळकर (त्रिकोणीय सामना) व दयाराम पाडलोस्कर (बवाळ ) यांना कथालेखक दि. बा. मोकाशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुळकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, महापालिका सचिव संजय जाधव, परीक्षक प्रा. दीपा ठाणेकर, हेमंत राजाराम, विश्वस्त अँड. सुरेश पटवर्धन, प्रा.जितेंद्र भामरे, अरविंद शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन लेखकांना केले मार्गदर्शन

नवीन लेखकांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की, अनेक जण आपल्या पुस्तकाला नामवंतांची प्रस्तावना घेण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्याची काहीच गरज नाही. तुमच्या जवळ असलेले अनुभव व शब्द याचे सामर्थ्य ओळखले तर निश्चितपणे कसदार लेखन होऊ शकते. आपल्या कोणत्याही कादंबरीला कोणाचीही प्रस्तावना घेतली नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ऐतिहासिक, सामाजिक कादंबल्यामध्ये मी कोणताही फरक करीत नाही. फक्त त्यातील पात्रांची भाषा, खास आणि ध्यास तुम्हाला कळला पाहिजे. तसे झाले तर पुढचा जमाना तुमचाच असेल असेही पाटील यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या गाजलेल्या पानिपत कादंबरीचे उदाहरण दिले.

जुन्या आठवणीना दिला उजाळा

पाटील यांनी पानिपत ही कादंबरी लिहिण्यामागे आपल्या वडिलांची प्रेरणा असल्याचे भाषणात सांगितले. त्याचा किस्सा नमूद करताना जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, एका कार्यक्रमात मला सहभागी होऊ दिले नाही. याचे खूप वाईट वाटले.ही बाब घरी आल्यानंतर मी वडिलांना सांगितले व ते म्हणाले हातामध्ये लगोरी घेऊन गावातील चिमण्या मारण्यापेक्षा वाघाच्या छावणीमध्ये का जात नाही? असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर मी अंतर्मुख होऊन तब्बल ६ वर्षे फक्त पानिपत पानिपत, आणि पानिपताचाच विचार केला. त्यानंतर ही रेकॉर्ड ब्रेक कादंबरी साकारली.

यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या प्रगतीसाठी महानगरपालिका मदतीचा हात पुढे करेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुळकर्णी यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला.