कल्याण
काळाच्या ओघात आपल्याकडून अनेक शब्दांचा वापर कमी झाला. परिणामी शब्द मागे पडून घरंगळून गेले. जातं सरलं तिथे ओवी सरली, सार्वजनिक ठिकाणच्या गप्पा, एकांतातल्या मनाशी गप्पा संपल्या आणि माणसं गप्प झाली, असे निरिक्षण सुप्रसिद्ध सुसंवादिका आणि लेखिका धनश्री लेले यांनी नोंदवले. के. बी. विरा शाळेच्या पटांगणात आयोजित ग्रंथोत्सवात ‘शब्दमोती’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा, डोंबिवली आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारीपासून डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माळेत शुक्रवारी सुप्रसिद्ध सुसंवादिक आणि लेखिका धनश्री लेले यांनी तिसरी सांस्कृतिक माळ गुंफली. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने शब्दमोती कार्यक्रमातून शब्दांचा जन्म, त्याची महती, त्याचे नातेवाईक, साहित्य आणि वाङमयातील त्याचा वापर त्यांनी आपले गायक सहकारी नेहा पुरोहित आणि अनुराग नाईक यांच्या संगीतविरहीत गाण्यातून उलगडून सांगितला.
बदलत्या जीवनशैलीत अनेक वस्तू कालबाह्य होऊन अडगळीत पडतात, मग त्याच्याशी संबंधित असलेले शब्दही मागे पडून घरंगळून जातात. भाषेची श्रीमंती जपायची असेल तर विस्मरणात जात असलेले शब्द शोधून ते योग्य ठिकाणी वापरात आणायला हवेत, असे प्रतिपादन लेले यांनी यावेळी केले. संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, शांता शेळके, सुधीर मोघे आदी भाषाप्रभूंच्या रचनांचे उदाहरणासहित दाखले देत त्यांनी मराठी भाषेच्या अभिजात श्रीमंतीची ओळख रसिकांना करून दिली. संत ज्ञानेश्वरांच्या ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ या काव्यापासून या कार्यक्रमाची सुरेल सुरूवात झाली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यात वापरलेले शब्द फक्त त्याचा अर्थच सांगत नाही तर एक विचारही सांगतात हे त्यांनी पुराव्यांसह दाखवून दिले. ‘मन मनास उमगत नाही’, ‘वेगवेगळी फुले उमलली’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘सांज ये गोकुळी’ अशा अनेक गाण्यांतून त्यांनी शब्दांमागचा गर्भीतार्थ उलगडून सांगितला.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर