December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मराठी भाषा गौरव दिन विशेष : मराठी भाषा ‘अभिजात’ व्हावीच…!

मराठी भाषा ‘अभिजात’ व्हावीच…!

रविवार, २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन.

भारतीय साहित्यातील सर्वोच्च सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते थोर साहित्यिक कवीवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस.

कुसुमाग्रज

कुसुमाग्रजांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा’ अशा शब्दांत थोरवी गायलेल्या मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आली आहे. आताही या मागणीने जोर धरला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी दरवेळी हा कळीचा मुद्दा उपस्थित होत असतो आणि पुन्हा तो विस्मृतीत जातो. यावेळी मात्र तसे होणार नाही अशी वातावरण निर्मिती केली आहे. कोणत्याही भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष लावले गेले आहेत. ‘अमृतातेही पैजा जिंके’ असा लौकिक मिरविणारी मराठी भाषा ‘अभिजात’तेच्या निकषात बसू नये हा दैवदुर्विलासच..!

मराठी भाषा ‘अभिजात’ ठरावीच इतकी ती प्राचीन नक्कीच आहे. त्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी कधी मुहूर्त मिळणार..? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा हीच तमाम साहित्य वर्तुळाची अन सर्वसामान्य मराठी प्रेमींची अपेक्षा आहे.

फोटो – फेसबुकच्या सहकार्याने

केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू…

मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य क्षेत्रासह विविध सामाजिक वर्तुळांतून मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. परंतु, अद्याप त्याला मूर्तस्वरूप आलेले नाही. मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहेत. पण अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरु करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सहा हजार पोस्टकार्ड्सही पाठवण्यात आली आहेत. कला, साहित्य, क्रीडा, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही पत्रे लिहिली आहेत. मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा या मागणीसाठी विविध क्षेत्रातील लोक एकत्र आले असून खूप चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळालेला आहे. या सर्वांच्या स्वाक्षरीने ही पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्याआधीही या मागणीची सुमारे १ लाख २० हजार पत्रे पाठवण्यात आली आहेत.

केंद्राच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत..

सुभाष देसाई यांनी नुकतीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा तोही मराठी भाषा गौरव दिनाआधी अशी मागणी केली आहे. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यासाठी ‘ज्ञानपीठ’ विजेते कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनासारखा दुसरा सुदिन असू शकत नाही असा प्रस्तावही त्यांनी ठेवला आहे. तत्पूर्वी, ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे मराठीने सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे मराठीला लवकरच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळेल याबाबत संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सांस्कृतिक मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीच्या ‘अभिजात’तेचा मुद्दा उपस्थित केला होता. सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेल्या ग्वाहीच्या आधारे मराठी भाषेला लवकरच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत देसाई यांनी दिले आहेत. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये एक भाषा समिती स्थापन केली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ मध्ये पूर्ण केला. तेव्हापासून म्हणजे जवळपास दशकभर ही मागणी केंद्राच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.

मनसेने सर्वप्रथम सुरु केली पद्धत…

‘मराठी भाषा गौरव दिना’ निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुढचे पाऊल उचलले आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. वास्तविक मराठी भाषा दिन साजरा करण्याची पद्धत राज ठाकरेंच्या मनसेनेच सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली. हा आपल्या भाषेचा ‘गौरव’ दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, असे आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. ज्या भाषेने कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा हा ‘गौरव’ दिवस आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखी द्रष्टी माणसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे समाजाला जागे ठेवणारे लोककलावंत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच..! याकडे राज ठाकरेंनी पत्रात लक्ष वेधले आहे. 

भोर तालुकाही पुढे सरसावला…

पुणे जिल्ह्यातील भोर तालुकाही मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पुढे सरसावला आहे. साहित्य, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत भोर तालुक्यातील २७५० महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पत्र पाठवून विनंती केली आहे. मातृदिनाचे औचित्य साधून या महिलांनी हे पाऊल उचलले आहे. तालुक्यातील ३८ गावांतील महिला बचत गटांतील या महिलांनी पोस्टकार्ड लिहून मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा देण्यात यावा यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली आहे. अर्थात यातील राजकीय मुद्दा वगळला तरी मराठी ‘अभिजात’ व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे. 

देशातील सहा भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा

आतापर्यंत देशातील सहा भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. देशात तामिळ ही ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. संस्कृतच्याही आधी तामिळ भाषेला हा दर्जा मिळाला हे विशेष. सर्वप्रथम २००४ साली तामिळ भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर २००५ साली संस्कृत भाषेला, २००८ साली कन्नड आणि तेलगु भाषेला, २०१३ साली मल्याळम भाषेला आणि २०१४ साली ओडिया भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यात आला. हे सगळे निर्णय अर्थातच तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्याच काळात घेतले गेले. नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष…

‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात. पहिला म्हणजे, त्या भाषेतील साहित्य १५०० ते २००० वर्षे जुने असावे. दुसरा निकष म्हणजे, हे प्राचीन साहित्य मौल्यवान, महत्त्वाचे असावे. भाषेला स्वयंभूपण असावे. ती दुसऱ्या भाषेतून उसनी घेतलेली किंवा त्या भाषेवर अवलंबून असलेली नसावी, हा तिसरा निकष आहे. आणि चौथा निकष म्हणजे, भाषेचे प्राचीन स्वरुप आधुनिक स्वरुपापेक्षा वेगळे असावे. एखाद्या भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून त्या भाषेच्या विकासासाठी निधी उपलब्ध होतात, केंद्रीय विद्यापीठांमध्ये त्याची अध्यासने तयार होतात, विविध आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्याही जाहीर होतात.

फोटो – फेसबुकच्या सहकार्याने

‘अभिजात’ दर्जा मिळावा ही काळाची गरज..

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींपासून समकालीन व नंतरच्या संतांनीही मराठी भाषेची उचित थोरवी सांगितली आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी सध्याच्या अनेक कवींनी मराठी भाषेविषयी असलेला अभिमान आपल्या साहित्यातून व्यक्त केला आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी तर आपल्या ‘ज्ञानेश्वरी’च्या प्रारंभीच ‘माझ्या मराठीचा बोलु कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ अशा समर्पक शब्दांत मराठीची सार्थ महत्ती वर्णिली आहे. अशी अमृतातेही पैजा जिंकण्याचे सामर्थ्य असलेल्या मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळण्यासाठी चळवळ उभारावी लागणे खचितच अभिमानास्पद नाही. देशासह जगभरातील विविध भागांत बोलली जाणाऱ्या या भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा ही काळाची गरज आहे, नव्हे तो तिचा हक्कच आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री सकारात्मक असतील तर हा मूहूर्त लवकर निघावा याची उत्सुकता तमाम मराठीजनांना आहे.

विशेष प्रतिनिधी