मराठी जपणाऱ्या भाषाप्रेमींचा केला गौरव
डोंबिवली
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रंथोत्सवाची रविवारी मराठी भाषा दिनी सांगता झाली.
आपल्या कार्यकर्तुत्वाने मराठी भाषा जपणाऱ्या भाषाप्रेमींचा सत्कार यावेळी करण्यात आला. फ्रेंडस् लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै, जगभरातील अमराठीजनांना मराठी भाषा शिकविणारे कौशिक लेले, आपल्या अपंगत्वावर मात करत साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळवणारे कवी किरण पाटील, ‘पाऊली’ या पहिल्याच लघुपटाच्या माध्यमातून दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारणारे नचिकेत दांडेकर, आदित्य फराड, अभिजीत दळी या महाविद्यालयीन तरूणांचा यांमध्ये समावेश होता.
गेल्या २४ दिवसात विविध विषयांवरील सात हजारांहून अधिक पुस्तकांची या प्रदर्शनात विक्री झाली. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून तीन दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने डोंबिवलीकरांना अनुभवता आली. रविवारी झालेल्या सांगता सोहळ्यात डोंबिवलीतील १३ शाळांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर शाखेच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली. मॉडेल स्कुल, साऊथ इंडियन शाळा, मंजुनाथ विद्यालय, स्वामी विवेकानंद (गोपाळनगर), स्वामी विवेकानंद (दत्तनगर), विद्यानिकेतन, ज्ञानमंदिर, के.बी.विरा, पालिकेची सयाजीराव गायकवाड प्राथमिक शाळा आदी शाळांचा त्यात समावेश होता. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे ही पुस्तके सूपूर्द करण्यात आली. यानिमित्ताने लोकप्रिय मराठी गाण्यांची मैफलही आयोजित करण्यात आली होती.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर