कल्याण
मुलांना सातत्याने प्रश्न पडायला पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजे, म्हणजेच आपण विज्ञानाच्या जवळ जाऊन नवनवीन प्रयोग करायला शिकू असे उद्गार राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित राहनाळ शाळेतील कार्यक्रमात काढले.
२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान प्रदर्शन, विज्ञानाचे प्रयोग या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच राजेंद्र मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक संदिप भोईर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विलास रामेष्टे हे उपस्थित होते. डॉ. सी व्ही रमण यांनी भौतिकक्षेत्रामध्ये प्राप्त केलेल्या नोबेल पुरस्कारप्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.
यावेळी, मुलांनी छोटे छोटे प्रयोग स्वतः तयार करून सादर केले. शेतीसाठी पाणीपुरवठा करणे, जलचक्र, पाण्याचा पृष्ठीय ताण, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, ओला कचरा सुका कचरा, पाण्यात विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे, राहनाळ गाव, असे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडले होते. मूत्राशय, चेतापेशी, त्वचेची रचना, मानवी डोळा, मेंदूची रचना यांच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने काढल्या होत्या. मढवी यांनी सर्व प्रयोग पाहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.
याच कार्यक्रमामध्ये अजय पाटील लिखित दिग्दर्शित भन्नाट आयडिया हे प्लास्टिक मुक्तीच्या विषयावर बनवलेल्या शॉर्ट फिल्म चे उद्घाटन गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. या शॉर्ट फिल्ममध्ये श्वेता टोळे, राधिका पाटील, पूजा ठाकूर या मुलींनी अभिनय केला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजय पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील, रसिका पाटील, संध्या जगताप या शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या जगताप तर आभार प्रदर्शन रसिका पाटील यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगाचे सर्व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर