December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

शाळेतील विद्यार्थिनींसोबत डॉ. फरमन

शाळेतील विद्यार्थिनींसोबत डॉ. फरमन

कल्याण : जीवनामध्ये निश्चित ध्येय ठेवले तर यश मिळतंच – डॉ. फरमन

राहनाळ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

कल्याण

राहनाळ गावात राहून मी सातत्याने शिक्षणाचा विचार करत होते, लहानपणापासूनच मला डॉक्टर बनण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून मी माझा अभ्यास त्याच पद्धतीने सातत्याने करत राहिले. माझं प्रायमरी शिक्षण संपल्यानंतर अकरावी, बारावीसाठी मी ठाण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. बारावी झाल्यानंतर मात्र, एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी रशिया या देशात गेली. रशियामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या देशातील इथल्या रुग्णांची सेवा करावी या उद्देशाने पुनश्च मी भारतात परतले. माझ्या यशामध्ये माझी आई, माझे बाबा, नातलग यांनी मला सातत्याने मार्गदर्शन आणि मदतच केली. या सर्वांच्या सहकार्याने मी डॉक्टर बनू शकल्याचे वक्तव्य डॉक्टर मनाली फरमन यांनी येथे केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील उच्चशिक्षित डॉक्टर मनाली शेखर फरमन यांचा सत्कार समारंभ राहनाळ शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, प्रतिभा नाईक, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा माळी, महिला पालक, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉक्टर मनाली यांनी सांगितले की, पैशाविना कोणाचे शिक्षण कधी आडत नाही, आपल्याकडे जिद्द पाहिजे. त्याचबरोबर आपण इंग्रजी शाळेत शिकलो वा मराठी शाळेत शिकलो म्हणून आपलं काही कुठे आडत नाही. मी जेव्हा रशियाला शिकायला गेले, तेव्हा तिथे आम्हाला रशियन भाषा शिकायला मिळाली. डॉक्टर मनाली यांनी रशिया मध्ये गेल्यानंतर तिथे रशियन भाषा न आल्यानं उडालेल्या गमतीजमती विद्यार्थ्यांबरोबर शेअर केल्या. मुलींनी शिक्षणामध्ये पुढे जावं असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

सामाजिक कार्यकर्त्या मनिषा माळी यांनी विद्यार्थ्यांना शिकून पुढे जावं. सातत्याने आपल्या आई बाबांची मेहनत लक्षात ठेवावी. जन्मदात्या आईबरोबरच पालन-पोषण करणारी आईही माझ्या काळजाचा तुकडा आहे. आईच्या आठवणी यावेळी माळी यांनी सांगितल्या. शाळेतील शिक्षिका रसिका पाटील यांनी जागतिक महिला दिना बरोबरच आपण स्वतः शिक्षिका कशा झालो? तो प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. अनघा दळवी आणि चित्रा पाटील या शिक्षकांनी आपला शिक्षणाचा आणि शिक्षकी पेशातील अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले.

अंगणवाडीच्या सेविका अमृता पवार यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे कौतुक करून, मुलींनी शिक्षणामध्ये पुढे जाऊन आपल्या घराचं, गावाचं नाव मोठं करावं असा सल्ला दिला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कड म्हणाल्या की, शाळेमध्ये सातत्याने नवनवीन कार्यक्रम आणि उपक्रम होत आहेत. त्याचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना निश्चितच होणार आहे. शाळेमध्ये एक नवचैतन्य राहतं असं त्या म्हणाल्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुलांनी रांगोळ्या काढून सजावट केली. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची संकल्पना, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अजय पाटील यांनी केले.