October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

रंजना शेडगे

रंजना शेडगे

महिला दिन विशेष : महिलांना ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचा ध्यास घेतलेल्या रंजना शेडगे

आज जागतिक महिला दिन. महिलांना त्यांच्या आत्मसन्मानाची-हक्कांची जाणिव करून देणारा दिवस. महिलांच्या उत्कर्षाची तळमळ, त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा ध्यास या समर्पित भावनेने महिलासेवेचे व्रत स्वीकारलेल्या रंजना शेडगे यांच्या सेवाभावी कार्यावर आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त एक कटाक्ष...

खास प्रतिनिधी

आधी पदरी कसलाही अनुभव नसताना केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि समाजकार्याची आवड यामुळे महिला बचतगटांच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना आर्थिक मदतीचा हात देतानाच त्यांना बचतीचा मूलमंत्र सांगणाऱ्या रंजना विलास शेडगे यांच्या ‘समाजसेवा’ कार्याला यंदा बारा वर्षे होत आहेत. एक ‘तपा’च्या या समाजसेवेच्या प्रवासामध्ये कुटुंबातून मिळालेले भक्कम पाठबळ आणि सहकारी महिलांनी दिलेली तितकीच मोलाची साथ या भांडवलावर रंजना शेडगे यांच्या कामाचे क्षितीज आज कल्पनातित विस्तारले आहे. महिला बचतगटांच्या कामाबरोबरच ‘मराठा सेवा संघ’ आणि ‘जिजाऊ ब्रिगेड’ या संस्थांच्या कामात देखील त्यांनी स्वत: ला वाहून घेतले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन करीत, त्यात आपण कुठेही कमी पडणार नाही याची आवश्यक ती खबरदारी घेत त्यांनी हा समाजसेवेचा वसा जपला आहे.

आज (मंगळवार ८ मार्च) जागतिक महिला दिन. महिलांना त्यांच्या आत्मसन्मानाची-हक्कांची जाणिव करून देणारा दिवस. महिलांच्या उत्कर्षाची तळमळ, त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा ध्यास या समर्पित भावनेने महिलासेवेचे व्रत स्वीकारलेल्या रंजना शेडगे यांच्या सेवाभावी कार्यावर आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त एक कटाक्ष…

सर्वसामान्यांपासून सर्वांनाच बचतीचा मूलमंत्र सांगणारा ‘बचतगट’ हा शब्द आज सर्वमान्य झाला आहे. विशेषत: महिला बचतगट ही संकल्पना समाजात चांगलीच रूजली आहे. ‘बचत’ या शब्दातच या संकल्पनेचे बीज रूजले आहे. संसाराचा गाडा हाकताना येणाऱ्या अडचणींवर मात करीत उपजीविका चालविण्यात आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना बचतगटांनी ‘आश्वासक’ आधार दिला आहे, त्यांना स्वावलंबी बनवले आहे. कुटुंबाला आधार देताना आपलाही ‘खारीचा वाटा’ उचलण्यासाठी प्रसंगी घरकाम करून संसाररथ हाकणाऱ्या साध्या गृहिणींची ‘पत’ निर्माण करण्यात बचतगटांचे मोठे योगदान लाभले आहे. राज्यात आज सर्वदूर बचतगटांचे जाळे विस्तारले आहे. गोरगरिबांचा आधार बनले आहे. शासन-प्रशासन स्तरावरील प्रोत्साहन आणि समाजमान्यता यामुळे महिला बचतगटांना बळकटी मिळाली आहे. अनेक महिला बचतगटांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. ठाणे शहरामधील कोपरी विभागातील आनंद नगर येथील रंजना विलास शेडगे यासुद्धा याच साखळीतील एक. मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या या परिसरात बचतगट ही संकल्पना रूजविण्यात मोलाची व सक्रिय भूमिका बजावलेल्या रंजना शेडगे आजमितीस पाच महिला बचतगटांचा कार्यभार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांभाळत आहेत. घरदार सांभाळून सर्वसामान्य मध्यमवर्गीय महिलांना बचतगटांच्या माध्यमातून ‘स्वावलंबी’ बनवत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त या समाजसेवी कार्याबद्दल प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना बोलते केले…

‘जननी’ची स्थापना ते…

बचतगटाच्या कामाला २०११ मध्ये सुरूवात केली. समाजसेवेची आवड आणि मैत्रिणींनी दिलेली साथ या शिदोरीवर या क्षेत्रात पाऊल ठेवले. २०११ साली सर्वप्रथम ‘जननी महिला बचतगटा’ची स्थापना केली. २०१६ पर्यंत २० सभासद महिलांच्या साथीने हा बचतगट चालवला. सहकारी महिलांच्या विश्वासाच्या बळावर ५ वर्षे अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. या कालावधीत महिलांना त्यांच्या बचतीवर भरघोस लाभ मिळवून दिला असे रंजना शेडगे सांगतात. एव्हाना परिसरात ‘जननी महिला बचतगटा’चे चांगलेच नाव झाले होते. मागणी होऊ लागल्याने ‘जननी’मधूनच काही महिला व काही नवीन महिला यांना घेऊन आणखी दोन बचतगट स्थापन केले. त्यांना अनुक्रमे ‘मधुरा महिला बचतगट’ व ‘चिंतामणी महिला बचतगट’ अशी नावे दिली. स्थापना वर्ष होते २०१६. सभासद संख्येची २० ही मर्यादा कायम होती. या दोन्ही बचतगटांमध्ये सल्लागार म्हणून सक्रिय भूमिका बजावली. या काळातही महिलांना बचतीवर चांगला परतावा मिळवून दिला. आनंद नगर हा झोपडपट्टी परिसर. मोजकेच अपवाद वगळता येथील बहुतांश महिला घरकाम करणाऱ्या. त्यांना घरदुरूस्ती, मुला-मुलींची लग्ने आदी अत्यावश्यक कामांसाठी बचतगटांच्या माध्यमातून मोठ्या रकमेची मदत कर्ज रुपात मिळवून दिली. अडीअडचणीच्या वेळी त्यांना सोनार किंवा पतपेढी-बँकेमध्ये वस्तू गहाण ठेवून कर्ज घ्यावे लागत असे. बचगटांमुळे त्यांना मोठी मदत झाली. त्यांचा वेळ व श्रम यांचीही बचत झाली अशी माहिती रंजना शेडगेंनी दिली.

कटू अनुभव नाही…

या क्षेत्रात मी माझ्या मनानेच आले. समाजकार्य करणाऱ्या मैत्रिणीही होत्याच. त्यामुळे बचतीची सवय लागली. आधी अनुभव नव्हता. पण बचतगटांबद्दल ऐकून होते. त्यामुळे उत्स्फूर्तपणे उडी घेतली आणि त्यात स्वत:ला झोकून दिले. परिसरातील महिलांची साथ मिळत गेली आणि हा पसारा विस्तारला असे त्यांनी सांगितले. बचतगटांतील सभासद-पदाधिकारी महिलांचा अगदी प्रारंभापासूनच चांगला प्रतिसाद मिळत गेला. गरजेच्या वेळी घेतलेल्या पैशांची परतफेड त्या वेळेत करीत गेल्या. त्यामुळे इतर गरजू महिलांनाही अडचणीच्या वेळी पैसे उपलब्ध होत गेले. सर्वच महिलांची चांगली साथ लाभत गेली. या महिला सर्वसाधारण व गरीब कुटुंबातील असल्याने आणि त्यांचा सारा वेळ घरकाम करण्यातच जात असल्याने त्यांना आर्थिक व्यवहारांचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहारांची जबाबदारी मला स्वत:लाच सांभाळावी लागत होती. त्यांच्या विश्वासाच्या बळावर ती मी लिलया पेलली. त्यांच्याच सहकार्याच्या बळावर ‘जननी’नंतर दोन नवे बचतगट स्थापन करण्याची ऊर्जा मिळाली.

बँकेचे सहकार्य…

प्रारंभी सभासद महिलांकडून बचत म्हणून २०० रुपये काढले जात होते. त्यातून कमी रकमेची कर्जे दिली जाऊ शकत होती. पुढे कामकाज विस्तारले तशी गरजांमध्येही वाढ होत गेली. परिणामी मोठ्या रकमेच्या गरजांची विनासायास पूर्तता व्हावी या हेतूने सर्वांच्या सल्ल्याने आणि एकमताने बचतीची रक्कम ५०० रुपये केली. त्यामुळे महिलांना चांगला लाभ होऊ लागला. त्यांची धावपळ कमी झाली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सभासद महिलांना मोठ्या रकमेची कर्जे उपलब्ध होत गेली. बँकेने वेळोवेळी गरजांनुसार कर्ज उपलब्ध करून दिल्याने त्यांचा भार हलका झाला. त्यांच्याकडून कर्जाची निर्धारित मुदतीत परतफेड कशी होईल याची योग्य ती दक्षता घेतली. सुदैवाने सर्वच महिला मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या असूनही कधीही कर्जाऊ रकमेच्या परतफेडीबाबत कधी कटू अनुभव आला नाही. त्यातूनच त्यांच्या उत्कर्षासाठी मनोबल वाढत गेले. महिलांनी दाखविलेली सचोटी आणि बँकेने वेळोवेळी केलेले उत्तम सहकार्य यामुळे या प्रवासामध्ये कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवली नाही अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

लाभांशात भेदभाव नाही…

बचतगटांतील सर्व सभासद महिलांना त्यांच्या बचतीवरील लाभांशाचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला नाही. सर्वांना समान लाभांश दिला. एखाद्या महिलेने कर्जाचा लाभ घेतला नसला तरी तिच्या बचतीचे पैसे इतरांना कर्ज देताना उपयोगी आलेच. त्यामुळे समन्यायी पद्धतीने लाभांश वाटप केले. त्यामुळे कोणाचीही नाराजी अनुभवावी लागली नाही असे त्या सांगतात. नोंदणीकृत असल्याने बचतगटांना महानगरपालिकेच्या माध्यमातून अनुदान मिळते. महानगरपालिकेने महिलांसाठी काही योजनाही दिल्या होत्या. परंतु, जवळपास सर्वच महिला या घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या असल्याने व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा कामाचा वेळ असल्याने त्या वेळ देऊ शकत नव्हत्या. परिणामस्वरूप या योजना अंमलात आणल्या जाऊ शकल्या नाहीत.

‘हिरकणी’तील रोल…

ठाण्यासह परिसरात कार्यरत हिरकणी महिला उत्कर्ष संस्थेत २०१२ साली कामकाज सुरू केले होते. महिला सबलीकरणासाठी झटणाऱ्या या संस्थेत स्वत: सभासद झाले. लौकिकार्थाने या संस्थेत कोणतेही पद मिळाले नव्हते अथवा ते घेतलेही नव्हते. महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात ठामपणे उभे राहणे हे संस्थेचे मुख्य काम. दरवर्षी ८ मार्चला भव्यदिव्य प्रमाणात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. केवळ आनंद नगर परिसरातून या संस्थेसाठी कमीत कमी एक हजार सदस्य मिळवून देण्याचे काम केले.
२०१८ मध्ये आणखी दोन महिला बचत गटांची जबाबदारी खांद्यावर आली. वास्तविक हे महिला बचतगट अन्य महिलांचे होते. परंतु, काही कारणास्तव ते चालविण्यात त्या असमर्थ ठरल्याने त्या सल्ल्यासाठी आल्या. अर्थात त्यांची सर्वस्वी जबाबदारी न स्वीकारता त्यांना सहकार्य करण्याचा मध्यम मार्ग निवडला. त्यांना बँकेत खाते उघडून देण्याकामी सर्वतोपरी मदत केली. साई ओम महिला बचतगट व साई महिला बचत गट या बचतगटांची धुरा संबंधित महिलांच्या माध्यमातूनच सांभाळली जात असून मी केवळ सूत्रधाराच्या भूमिकेत आहे, असे रंजना शेडगे सांगतात.

विश्वास वृद्धींगत होत गेला…

या बचतगटांचाही कारभार उत्तम चालला आहे. उत्तम व्यवहार आणि पैशाचा उत्तम विनियोग यांमुळे महिलांचा परस्परांवरील विश्वास वृद्धींगत होत गेला आहे. बचतगटांचा कारभार, सल्लागाराची जबाबदारी, ‘जिजाऊ ब्रिगेड’ आणि ‘मराठा सेवा संघ’ या आघाड्यांवर काम करताना वेळेची स्पर्धा करावी लागत असणारच. त्याचा ताळमेळ कसा साधला जातो अशी विचारणा केली असता, रंजना शेडगे यांनी सांगितले की, कोणत्याही कामकाजाची सरमिसळ होऊ दिली नाही, किंबहुना ती झालीच नाही. कारण बचतगटांचे कामकाज दर महिन्याच्या १ ते १२ तारखेपर्यंतच चालते. ‘जिजाऊ ब्रिगेड’ आणि ‘मराठा सेवा संघा’चे काम संध्याकाळच्या वेळी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच करते. निमंत्रणानुसार संस्थांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असते. त्यामुळे वेळेची फारशी कसरत करावी लागत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडूनच समाजसेवा करते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर कोणताही परिणाम आजवर तरी झाला नाही. घरातूनही अपेक्षित व चांगले सहकार्य मिळत गेल्याने कामातील उत्साह वाढत गेला. शिवाय बचतगटांतील महिलांनाही जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. बचतगटांतील महिलांनाच ‘जिजाऊ ब्रिगेड’मध्ये सामील करून घेतले आहे. त्यांची चांगली साथ लाभत आहे. या साऱ्या प्रवासात कोणाचेही विशेष असे मार्गदर्शन मिळाले नाही अथवा ते घेतलेही नाही. स्वत:हून मार्ग शोधत गेले. समाजकार्याची आवड त्याला अधिकांश कारणीभूत ठरली.

जिजाऊंचा आदर्श…

सामाजिक कार्यातील आपल्या सहभागामुळे आपण कोणाच्या तरी उपयोगी पडतो याचे मनस्वी समाधान लाभते. नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेण्याचा स्वभाव होताच, तोच या कार्यात उपयोगी आला. राजमाता जिजाऊ, महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आदींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करीत गेले, त्याला यश मिळत गेले. आज महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, त्याचे नि:संशय श्रेय या थोर पूर्वसुरी महिलांनाच जाते. त्यांच्या आदर्शातून प्रेरणा मिळते, कामाचे समाधान मिळते. प्रत्येक स्त्रीने कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत स्वत:साठी जगतानाच सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावावे, समाजाच्या उत्कर्षात हातभार लावावा, प्रत्येक महिलेच्या पाठीशी चांगल्या-वाईट प्रसंगात खंबीरपणे उभे राहून त्यांना आपल्याबरोबर घेऊन जावे, समाजात मानसन्मानाचे स्थान मिळवावे इतकाच सल्ला यानिमित्ताने द्यावासा वाटेल, असे रंजना शेडगे यांनी सांगितले.

 

हेदेखील वाचा – महिला दिन विशेष : लैंगिक समानता आवश्यक