April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

हलगी वाजवत मातंग समाजाने काढला मोर्चा

हलगी वाजवत मातंग समाजाने काढला मोर्चा

कल्याण : हलगी वाजवत मातंग समाजाने तहसील कार्यालयावर दिली धडक

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

कल्याण

आंबिवली मोहने येथील लहुजी नगरमधील मातंग समाजातील महिलांना खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी गांवगुंडांना मदत करण्याच्या हेतूने अश्लिल व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर आ.जाती कायदयानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाच्यावतीने हलगी वाजवत कल्याणच्या तहसीलदार कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात आला.

अखिल भारतीय मातंग संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप रोकडे यांच्या नेत्तृत्वाखाली, माजी नगरसेवक भीमराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली मालनबाई साठे, सुरेश साळवे, चक्रधर घुले, प्रकाश जाधव, गणेश ताटे आदींसह मोठ्या संख्येने मातंग समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या सुरुवात झालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

मोहने लहुजी नगर या वस्तीमध्ये सुमारे २५०० ते ३००० लोकं गेली ४०-४५ वर्षापूर्वीपासून राहतात. या भागात गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्या ठिकाणी आण्णाभाऊ साठे विद्यालय शाळा निर्माण करण्यात आलेली आहे. या शाळेच्या जागेत मोहने गावातील काही गावगुंड पार्कीगच्या नावाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या जागेबाबतचे प्रकरण दिवाणी न्यायालय कल्याण येथे न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाही अशोक पवार यांनी गांवगुंडांना मदत करण्याच्या हेतूनेच मातंग समाजातील महिलांना अश्लिल व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप यावेळी मोर्चेकरांनी केला.

त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु. अद्यापही गांवगुंडांवर व त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पवार यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करत त्यांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.