April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

ठाणे : बनावट बुचे निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त

ठाणे

भारतीय बनावटीच्या विविध विदेशी मद्याची बनावट बुचे निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाला यश आले आहे. याप्रकरणी तब्बल अकरा जणांना अटक करून ४० लाख ६९ हजार २६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी मालकासह मॅनेजर आणि अन्य एकाला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. हा कारखाना गेल्या तीन ते चार वर्षांपासून ठाण्यातील एमआयडीसी परिसरात सुरू असून अशाप्रकारे बनावट बुच मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील वागळे इस्टेट, येथील रघुनाथ नगर येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बनावट बुचे निर्मिती होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी छापा मारून तपासणी केली. यावेळी कारखाना मालकासह नोकर अशा ११ जणांनाा अटक करून तेथून ४० लाख ६९ हजार २६० रुपये किंमतीचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्याची निर्मितीतील यंत्र सामुग्री, बुचे व इतर सामान जप्त करण्यात आला. अटक केलेल्या ११ जणांपैकी सात जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली.

तर मुंबई, चांदीवली येथील इक्तार सिध्दीकी मुख्तीयार सिध्दीकी (५२) यांच्यासह ठाणे वाशिंद येथील राजु रामचंद्र यादव ( ३६), आणि मुलुंड येथील प्रशांत अरविंदभाई पटेल (३७) या तिघांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्या अकरा जणांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ) (ब) (क) (ई) (फ), ८० (१), ८१, ८३, ८६ (१) व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अ-१ विभाग ठाणे दुय्यम निरीक्षक एस. आर. दाबेराव करत आहेत.

ठाणे वागळे इस्टेट एमआयडीसी परिसरात हा कारखाना गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करून तो कारखाना उध्वस्त केला. अशाप्रकारे बनावट बुच मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. तसेच येथे तयार होणारे बुच हे कानपूर येथे पाठवले जात असल्याचे प्राथमिक तपास समोर आले. तसेच ते आणखी कुठे पाठवले जात होते का याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी अकरा जणांना अटक करून ४० लाख ६९ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नीलेश सांगडे,

अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग.