April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

ठाणे : सामन्यात आऊट झाला अन् एक्स्प्रेसमध्ये बसला

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

ठाणे

क्रिकेट सामना खेळताना दोन धावा न करता आऊट होऊन त्या सामन्यात आपल्या संघाचा पराभव झाला. त्यातच, आईसारखी क्लासला जा असे म्हणते, या रागातून एक्स्प्रेसमध्ये बसून जालनातून ठाण्यात आलेल्या एका दहा वर्षीय चिमुरड्याला ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने सुखरूपरित्या त्याच्या पालकांच्या अवघ्या तीन दिवसात स्वाधीन केले. त्यामुळे तो चिमुरडा स्वगृही परतला असून यासाठी ठाणे शहर पोलिसांनी जालनातील तब्बल १८ पोलीस ठाण्यातील पोलिसांशी संपर्क साधला होता.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात दहा वर्षीय चिमुरडा रडताना मिळून आला होता. त्याला उल्हासनगर येथील बालसुधारगृहात दाखल केले होते. याची माहिती मिळताच, ठाणे शहर पोलीस दलाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने तेथे जाऊन त्या चिमुरड्याला विश्वासात घेऊन बोलते केले. मात्र, तो चिमुरडा अचूक पत्ता सांगत नव्हता. तो फक्त जालना येथेच राहत असल्याचे सांगत होता. तसेच, ७ मार्च रोजी त्या चिमुरड्याला त्यांची आई क्लासला जाण्यासाठी तगादा लावत होती. मात्र, तो क्लासला न जाता थेट शाळेत गेला. पण, शाळेत न बसता तो मैदानात मित्रासोबत क्रिकेटचा सामना खेळू लागला. तो फलंदाजी करताना संघाला दोन धावांची आवश्यक होती. त्यावेळीच तो आऊट झाला. आपल्याला दोन धाव करता आल्या नाही. तसेच आई वारंवार क्लासला जाण्यासाठी तगादा लावते याचा राग मनात धरून जालना रेल्वे स्टेशन येथे जाऊन मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये बसला. तो ठाण्यात उतरला. अवघा दहा वर्षांचा असल्याने आणि वेगळ्या शहरात आल्याने पालकांची त्याला आठवण येऊ लागली. त्यातून तो रडत असताना त्याला पोलिसांनी उल्हासनगर बालसुधारगृहात नेले. यावेळी त्या चिमुरड्याने सांगितलेल्या जालना येवढ्याच पत्त्यावरून तेथील १८ पोलीस ठाण्यात संपर्क करून त्याच्याविषयी माहिती दिली. ओळख पुढे आल्यावर खातरजमा करून त्याला त्याच्या पालकांच्या हवाली केले. ही कामगिरी चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण यांच्या देखरेखीखाली सहा पोलीस उपनिरीक्षक बडगुजर आणि एस एन जाधव,पोलीस या पथकाने केली.

क्रिकेटच्या सामन्यात दोन धाव न करता आऊट झाला आणि आई क्लाससाठी तगादा लावते, या रागात तो एक्स्प्रेसमध्ये बसला आणि ठाण्यात आला. बालसुधारगृहात असताना त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने फक्त जालना इतकाच पत्ता सांगितला. म्हणून तेथील १८ पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. त्यामधील तो कदिम जालना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याने तो स्वगृही परतला आहे.

प्रीती चव्हाण,

सहाय्यक पोलीस निरीक्षक, चाईल्ड प्रोटेक्शन युनीट, ठाणे शहर पोलीस.