ठाणे
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि ग्रामीण भागातील पाझर तलाव, जलसाठे विकसित करण्यासाठी शासकीय निधीच्या माध्यमातून कमी खर्चाच्या शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. जेणेकरून या तलावांमध्ये पाणी साठा वाढून त्याचा वापर शेतीसाठी करता येईल, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुरबाड तालुक्यातील खेरावे येथे वसुंधरा संजीवनी मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या आरव जलसिंचन योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, माजी आमदार दिगंबर विशे, वसुंधरा मंडळाचे संस्थापक आनंद भागवत, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उद्योजक विश्वजीत नामजोशी आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या या पाझर तलावातील पाण्याच्या वापरासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा उपसा केला जाणार आहे. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर करता येणार आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधी देण्यात आला आहे.
याप्रकल्पासाठी दुर्गम भागातील पाझर तलाव शोधून त्यासाठी पुढाकार घेणारे वसुंधरा मंडळाचे आणि त्याचे संस्थापक भागवत यांचे कौतुक करीत पालकमंत्री शिंदे म्हणाले, या तलावात सुमारे ५० कोटी लिटर पाणी साठा आहे. ज्या तंत्रज्ञानाने पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाबरोबरच रब्बीमध्ये दुबार पीके घेता येतील. या तलावातील पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी हळद, भेंडी, मिरची या सारखी पीके घेऊन उत्पादन वाढविण्याचे आवाहन मंत्री शिंदे यांनी केले.
या पाझर तलावासाठी पाणी साठा वाढविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात यावा. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांचा समूह करून मोठ्या प्रमाणावर एकाच पिकाची लागवड करावी जेणेकरून पिकांचं क्लस्टर तयार होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल. यासाठी शासकीय योजनांमधून निधी मिळेल शेतकऱ्यांनीदेखील पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
ग्रामीण भागातील असलेले तलाव, जलस्त्रोतातील पाणी साठा वाढविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी त्याचे संवर्धनाचे काम झाले पाहिजे त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत केली जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
या प्रकल्पासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करणारे आयआयटीचे प्रा.डॉ. प्रदीप काळबर, संदीपक अध्यापक, प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य करणारे नामजोशी, डॉ. सुरोसे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आनंद भागवत यांनी आभार मानले.
हे देखील वाचा…
कल्याण : ४५ वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना नवी चालना – राष्ट्रवादी उपाध्यक्ष हिंदुराव
कल्याण : पर्यावरण मंत्र्यांनी लोकार्पण करूनही डायलिसीस केंद्र बंदच
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू