राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचा मानकरी
दोन्ही गटात मुंबई उपविजयी
कल्याण
स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित पहिल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र आणि मुंबई दोन्ही संघांनी अनुक्रमे विजेतेपद आणि उपविजेतेपद प्राप्त केले. महाराष्ट्र संघाने पुरुष, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही विजेतेपद प्राप्त केले तर मुंबई संघाने मिश्र दुहेरीत उपविजेतेपद प्राप्त केले.
महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी तानाजी कदम तर महिला संघाच्या कर्णधारपदी निशा चिकणे यांनी संघाचे नेतृत्व केले तर मुंबई संघाचे अविनाश पाटील आणि अश्विनी माळकर यांनी नेतृत्व केले. स्पर्धेचे गोल्डन प्लेयर म्हणून महाराष्ट्राचे असद शेख यांना सन्मानित करण्यात आले. तर नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या मनिषा सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आले. महाराष्ट्राकडून स्पर्धेत पंच म्हणुन तुषार वारंग आणि नामदेव येडगे यांनी कामकाज पाहिले.
नव्याने सुरू झालेल्या स्मॅश रॅकेट खेळाला सध्या कोणत्याही शासकीय सुविधा, अनुदान नसल्याचे राज्य संघटनेने खेळाडूंना अवगत केले होते तरीही सर्व खेळाडूंनी खेळाबद्दल असलेल्या आवडीमुळे स्वेच्छेने सहभाग नोंदवत हे यश संपादन केले यांसाठी महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर कोंढाळकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबई दोन्ही संघाचे स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हिरानंद कटारिया आणि सचिव मोहम्मद इकराम यांनी कौतुक केले.
येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडु चमकदार कामगिरी करतील त्याचबरोबर महाराष्ट्रात खेळांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सर्व खेळाडु एकत्रित काम करतील असे खेळाडूंनी यावेळीं सांगितले.
महाराष्ट्र पुरुष संघात तानाजी कदम, असद शेख, अदनान शेख, विकास जायभाये, फैजान शेख, रितेश पेटकर महिला संघात निशा चिकणे, साक्षी रोकडे, मनिषा सूर्यवंशी आणि रुपाली वाघूडें यांचा समावेश होता तर मुंबई पुरुष संघात अविनाश पाटील, सय्यद आयुब, माधव भिसे, शुभम रोकडे, प्रशांत सुरणार, स्वप्नील शिरसाठ महिला संघात अश्विनी माळकर, आरती बाकले, सिद्धेश्वरी जाधव, शुभांगी जाधव यांचा समावेश होता. संघाचे व्यवस्थापन परेश गुरव, विशाल सोडये, चेतन पाटील आणि शोभा वारंग यांनी केले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू