४३ अंश डिग्री तापमानाची नोंद
वाढत्या उकाड्यामुळे किडनी स्ट्रोनची समस्या उद्भवण्याचा धोका
कल्याण
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये उष्णतेचा तडाखा जाणवू लागला आहे. या वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याच्या समस्या उदभवण्याचा धोका वाढतोय. उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे अनेकांना किडनी स्टोन, अतिसार, उन्हाची झळ आदींचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून पोटाचे एक्स-रे, सोनोग्राफी अशा तपासण्या वाढल्या आहेत, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार सोमवारी सांताक्रुझ येथील वेधशाळेत ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तर २२.५ किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर, कुलाबा येथील वेधशाळेत ३७.६ अंश सेल्सिअस कमाल तर २३.५ किमान तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय कल्याणमध्ये मंगळवारी ४३ अंश सेल्सिअस अशा सर्वांधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ठाणे, कल्याण व डोंबिवलीत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात घामावाटे आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन होते. मात्र तेवढ्या प्रमाणात पाणी आपल्या शरीरात जात नाही. या पाण्याच्या कमतरतेमुळे मूत्र संग्रहण होण्यास कारणीभूत ठरतो. ज्यामुळे मुतखडा होण्याचा धोका वाढतो. लघवीमध्ये कॅल्शियम आणि युरिक ऍसिड तयार होण्यामुळे देखील किडनी स्टोन तयार होतात. जेव्हा वातावरणातील उष्मा वाढते तेव्हा किडनी स्टोनच्या प्रकरणांमध्ये वाढ होते.
खाण्यामध्ये तिखट, तळलेले, कोरडे, वातूळ पदार्थ जास्त असतात अशांना मूतखडा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच पोटात दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान व उपचार करून घ्या. वेळीच उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. विशेषतः मुतखड्याची ही समस्या स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.
उन्हाळ्यात मुतखड्याच्या रूग्णांमध्ये वाढ होतेय असं नाही. तर मुतखड्याच्या विकाराबाबत जागरूकता निर्माण झाल्याने तपासण्या वाढल्या आहेत. यामुळे अनेक रूग्णांची नोंद होत आहे. यात मुतखड्याचा त्रास असलेल्या अनेक रूग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं नसतात. मूत्रपिंडात खडे असलेल्या व्यक्तीला लघवी करताना वेदना आणि जळजळ, लघवीत रक्त येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि पाठदुखी, वारंवार लघवी होणे आणि ताप यांसारखी लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मूतखड्याचा त्रास टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा. खारट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. यामुळे मूतखड्याचा त्रास संभवू शकतो. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवा तसेच उन्हाच्या झळांपासून काळजी घ्या.
डाँ. अभय गायकवाड, संचालक
सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॉर्डियाक केअर सेंटर, कल्याण.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास