April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण : मनसेच्या पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

कल्याण

जागा डेवलपमेंट करण्याच्या नावाने घेऊन बांधकाम संस्था स्थापन करत त्या संस्थेच्या नावाने बँक खाते उघडून चेकवर खोट्या सह्या करून बँकेतून सुमारे ४ कोटी ११ लाख २१ हजार ७५३ रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कौस्तुभ देसाई आणि कल्पेश देसाई या दोघांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा फसवणुकीचा प्रकार सप्टेंबर २०११ ते मार्च २०२२ दरम्यान घडला आहे. कौस्तुभ देसाई हे मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष आहेत.

पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या फिर्यादी आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे असलेली गौरीपाडा येथील जागा कौस्तुभ आणि कल्पेश यांनी भागीदारीमध्ये डेव्हलप करण्यासाठी सप्टेंबर २०११ मध्ये घेतली. याचदरम्यान, ‘ड्रीम होम’ नावाने बांधकाम संस्था स्थापन करून ‘ड्रीम होम’ कंपनीचे बँक अकाऊंट खडकपाडा येथील एका बँक खात्यात सुरु करण्याचे फिर्यादी यांना त्यांनी सांगितले. देसाई यांच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांच्यासह साक्षीदार यांनी बँक खाते सुरु करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे, फोटो आणि अकाऊंट ओपनिंग फॉर्मवर सह्या दिल्या. त्यानंतर बँकेत खाते उघडत असल्याचे सांगितले. त्यानंतर, पुन्हा खडकपाडा येथील त्या बँकेचे व्यवहार तसेच सेवा बरोबर नाही असे सांगून बिर्ला कॉलेज येथील बँकेत खाते उघडतो असे देसाई यांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना सांगितले. परंतु, कौस्तुभ आणि कल्पेश यांनी ड्रीम होम कंपनीचे खाते फिर्यादी आणि साक्षीदार यांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता दोन्ही बँकेत उघडून फिर्यादी आणि साक्षीदार यांना ड्रीम होम कंपनीचे बिर्ला कॉलेज येथील बँकेत व्यवहार दाखवून खडकपाडा येथील बँकेच्या चेकवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करून त्या बँकेतून ४ कोटी ११ लाख २१ हजार ७५३ रुपये काढून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी कौस्तुभ आणि कल्पेश या दोघांविरोधात भादवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.