ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलला धडकलेल्या कारला मागून येणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवडा ब्रीजजवळ रविवारी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. यामध्ये चालकासह चौघे जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच कार आणि तिने धडक दिलेला स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिमाण झाला होता.
रविवारी सकाळी कारचालक अरहम खान (१८) याच्यासह इजलाल खान (१८), असद खान (१७) आणि ताहीर खान (२१) हे कार घेऊन ठाण्यातील हाजुरीतून मुंबई-नाशिक महामार्गावरून जात होते. माजीवडा ब्रीजजवळ आल्यावर ती कार ठाणे महानगपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवर जाऊन धडकली. याचदरम्यान त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या रिक्षाने त्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल, कापूरबावडी वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चौघांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघातात कार चालक अरहम याच्या डाव्या पायाला व उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. ताहीर याच्या डोक्याला तर असद याच्या उजव्या हाताला व डोक्याला तसेच इजलाल याच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर रिक्षाचालक रिक्षा सोडून पळून गेला.
हायड्रा मशीनच्या साह्याने व आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचाऱ्यांचे मदतीने कार व रोडवरती पडलेला स्ट्रीट लाईट पोल रोडच्या बाजूला केला. त्यानंतर, मुंबई-नाशिक महामार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
हे देखील वाचा…
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू