April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण : शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा

कल्याण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण नगरीत जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देवून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसेना शहर शाखेच्या वतीने चलचित्र रथांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, आमदार तथा शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, सचिन बासरे, अरविंद पोटे, परिवहन सदस्य सुनील खारूक आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आदिवासींचे तारपा नृत्य, झांजांचा निनाद, ढोल ताशांचा गजर, आकर्षक चित्ररथ आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत कल्याणात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सरकारी विश्रामगृहापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. कल्याण शहरात चौकाचौकात शिवसेना शाखांतर्फे शिवरायांच्या पराक्रमाचे गोडवे गाणारे देखावे सजवण्यात आले होते. भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा यांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सकाळपासूनच भगवे फेटे बांधलेले आणि भगवे झेंडे डौलाने मिरवणारे मावळे शिवाजी राजांना वंदन करत होते.

कोरोनामुळे दोन वर्षे शिवजयंती साजरी करता आली नव्हती मात्र यंदा शिवजयंती साजरी होत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह असून विविध देखावे आणि चलचित्र दाखवणारे सुमारे ३० रथ या मिरवणुकीत सहभागी झाले असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.