December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करा

माजी आमदार पवार यांची राज्य सरकारकडे मागणी

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना भेटून दिले निवेदन

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करा अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेट घेऊन पत्र दिले आहे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सभागृहात या संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याची विनंती केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मागणी केल्यानंतर मुंबई व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना राज्य सरकारने घरपट्टी माफ केली आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील घरांना सुविधेचा लाभ द्या अशी मागणी पवार यांनी सरकारला केली आहे. या संदर्भात येत्या १० दिवसांत जर निर्णय घेतला नाही तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढून याची तीव्रता लक्षात आणून देणार असल्याचे पत्रही मार्च २०२२ रोजी महानगरपालिकेला दिले आहे.

जर सरकार मुंबई आणि नवी मुंबईसाठी हा निर्णय घेत असेल तर तोच न्याय कल्याण डोंबिवलीलाही द्यावा. ५०० चौरस फुटापर्यंत घर असणारे नागरिक सामान्य असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना कर भरण्यासाठी दमछाक होते. यासाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी माजी आमदार पवार यांनी केली आहे.

दरम्यान, कल्याण पश्चिममधील विविध विकासकामाच्या संदर्भातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केल्याचे पवार यांनी सांगितले.