मनसे आमदारांनी मांडली होती विधानसभेत लक्षवेधी
पालकमंत्र्यांचे मनसे आमदारांनी मानले आभार
कल्याण
१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर १४ गावांचे श्रेय हे ग्रामस्थांच्या एकजुटीला असल्याची प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेली नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी पालकमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय होताच १४ गावातील ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
विधानसभेचे अधिवेशन आटोपून आमदार पाटील हे त्यांच्या पलावा येथील कार्यालयात परतले. तेव्हा त्याठिकाणी १४ गाव सर्व पक्षी संघर्ष समितीचे पदाधिकारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थांबले होते. पाटील यांचे आगमन होताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह पालकमंत्र्यांचे आभार मानले. आमदार पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची लक्षवेधी मांडली. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली जातील असा दुजोरा पालकमंत्री शिंदे यांनी दिला आहे.
हा लढा त्याठिकाणच्या संघर्ष समितीचा आहे. या गावांनी सलग तीन वेळा निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याचे सर्व श्रेय त्या गावातील एकजूटीला देत असल्याचे मान्य करीत आमदार पाटील यांनी पालकमंत्र्याचे आभार मानले आहेत.
तर संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील यांनी आमच्या १४ गावात पाच ग्रामपंचायती होत्या. ग्रामपंचायतीमुळे पाहिजे तसा गावांचा विकास होत नव्हता. गेल्या तीन निवडणूकांवर आम्ही बहिष्कार टाकला होता. आमची गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात यावीत अशी आमची मागणी होती. ही मागणी मनसे आमदार पाटील यांनी पाठपुरावा केला व निर्णय झाल्याचे सांगितले.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर