December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : मेळाव्यात तीनशे जणांना मिळाला रोजगार

कल्याण

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, कल्याण पूर्वच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन पूर्वेतील महाड तालुका समाज हॉल याठिकाणी करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात सुमारे ३०० हून अधिक जणांना रोजगार मिळाला. यावेळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, रिपाईचे जेष्ठ नेते अण्णा रोकडे, माजी शिक्षण मंडळ सभापती महादेव रायभोळे, समाजसेवक मिलिंद बेळमकर, समितीचे अध्यक्ष केतन रोकडे, कामेश जाधव, विवेक जगताप, किरण निचळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना महामारीत लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले असून, यामध्ये बेरोजगारांना आधार देण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध प्रकारच्या २५ ते ३० कंपन्या उपस्थित होत्या. मेळाव्यात ४०० ते ४५० लोकांनी नोकरीसाठी अर्ज केले होते. यापैकी सुमारे ३००  हुन अधिक लोकांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, कल्याण पूर्वच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. या जयंतीनिमित्त सर्वच शहरात अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून बेरोजगारांना रोजगार देण्याचे कार्य करण्याचे आवाहन जेष्ठ नेते अण्णा रोकडे यांनी केले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.