December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मुंबई : राज्यात आता कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेचे सहकार्य

मुंबई

राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्याने ज्ञान आदान-प्रदान (knowledge Sharing), अनुभव आणि उपक्रम यांच्या माध्यमातून उद्योजकता आणि नाविन्यतेच्या वृद्धीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प (महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट -MSDP) राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्री टोपे यांनी या प्रकल्पाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास नुकतीच मान्यता दिली. यानंतर राज्याच्या कौशल्य विकासाचा विस्तृत आराखडा (PPR) जागतिक बँकेसमोर सादर केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यात कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारात वाढ होईल, असा विश्वास मंत्री टोपे यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, इतर वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत बैठकांचे आयोजन केले होते. यामध्ये या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. आता मंत्री टोपे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने लवकरच हा प्रकल्प आकारास येणार आहे.