पंचायत समिती सभापती रेश्मा भोईर बिनविरोध
कल्याण
एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात रोजच सत्ता संघर्ष पाहायला मिळत असतांनाच कल्याणमध्ये भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्रितपणे येऊन सभापती निवडणूक बिनविरोध केली आहे. यामुळे कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या रेश्मा मुकेश भोईर यांची बिनविरोध निवड झाली. राज्याच्या राजकारणात नेते मंडळी एकमेकांशी लढत असली तरी कल्याणमध्ये स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली आहे.
आधीच्या सभापती अनिता वाघचौरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून आज सभापती निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी रेश्मा भोईर यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे अर्ज दाखल केला. सभापती पदासाठी रेश्मा भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी यांनी भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित सदस्य व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती भोईर यांना शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित सभापती भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश जाधव, रवींद्र टेंबे, भाजपचे ठाणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष जयराम भोईर, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ चौधरी, जिल्हा परिषद सदस्य रेशमा मगर आदी उपस्थित होते.
गेली ४ वर्षे सर्व सदस्यांनी एकमताने या पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती पद निवडून दिले आहेत. आज देखील या सदस्यांनी रेश्मा भोईर यांना सभापती पदी बिनविरोध निवडून दिले आहे.
सर्व सदस्यांना बरोबर घेऊन जी अपूर्ण कामे आहेत ती पूर्ण करणार असून ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे यावेळी सभापती भोईर यांनी सांगितले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर