December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याणमधील शासकीय विश्रामगृह

कल्याणमधील शासकीय विश्रामगृह

कल्याण : शासकीय विश्रामगृहात खोल्यांची संख्या वाढविण्याची मागणी

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले निवेदन

कल्याण

कल्याण शहरातील सध्याची वाढत्या लोकप्रतिनिधींची संख्या आणि राजकीय नेत्यांची कल्याणात वाढती गजबज बघता शासकीय विश्रामगृहामध्ये नवीन खोल्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपुर्ण कल्याण तालुक्यात मध्यभागी आणि कल्याण जंक्शन स्टेशनच्या जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे एकमेव शासकीय विश्रामगृह आहे. हे कल्याणचे शासकीय विश्रामगृह त्या काळापासून आहे जेव्हा या तालुक्यात फक्त एकच आमदार होते. तेव्हा ही या शासकीय विश्रामगृहात फक्त चारच खोल्या (सुट) होत्या आणि आता जेव्हा या तालुक्याला पाच आमदार लाभले आहेत. तर आताही तेवढ्याच खोल्या आहेत. याच चार खोल्यांमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची वर्दळ असते.

यामुळे येथे बरेचदा एखाद्या नेत्यांना बसायला सुद्धा जागा मिळत नाही. त्यामुळे कल्याण विश्रामगृहाचे कर्मचारी व अधिकारी यांची चांगलीच दमछाक होते. एखाद्या नेत्याला विश्रामगृहात बसायला जागा मिळाली नाही तर तो स्वतःचा झालेला अपमान समजून इथल्या कर्मचाऱ्यावर राग काढतो. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन नेते, आमदार, अधिकारी व न्यायधीश या विश्रामगृहात वास्तव्याला येतात. परंतु, इथे खोल्या कमी असल्याकारणाने त्यांना दुसरीकडे कुठेतरी मुक्काम करावा लागतो. कल्याणच्या या शासकीय विश्रामगृहात खोल्यांच्या कमतरतेमुळे अनेकवेळा अनेक समस्या उपस्थित होतात. ज्याचा सर्व ताण इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यावर येतो.

त्यामुळे इथल्या परिस्थितीचे अवलोकन करून कल्याणमध्ये असलेल्या शासकीय विश्रामगृहात नवीन खोल्या बांधण्याचे प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवून मंजूर करून घ्यावी अशी विनंती या निवेदनात माजी प्रदेश सचिव साळवे यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.