December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे

कल्याण : राष्ट्रवादीकडून विद्यार्थ्यांचा जाहीरनामा

निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनेचा उपक्रम

सूचना पाठविण्याचे केले आवाहन

कल्याण

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जाहीरनामा हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे यांनी दिली.

याबाबतची माहिती देताना रोकडे यांनी सांगितले कि, सध्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही यासाठी पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जाहीरनामा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्यभर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून सूचना मागविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी, शहरासाठी विद्यार्थ्यांप्रती एक स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे.

जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे

विद्यार्थी हा राज्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. आजचा सुदृढ विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक बनतो व तो राज्याचा, देशाचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी हातभार लावत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नावीन्यपूर्ण योजना तयार करून आपल्या महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे आहे. हा विचार समोर ठेवून विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना, राज्यातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला सुलभतेने शिक्षण मिळण्याची प्रक्रिया, त्यासंबंधीच्या योजना अशा अनेक बाबींवर काम करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगानेचे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही विद्यार्थ्यांचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करणार आहोत. हा जाहीरनामा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अमलांत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी राज्यातील व देशातील विद्यार्थी युवक कल्याण, ग्रामीण व शहरी विकास, शिक्षण, उद्योजकता, रोजगार आदी विषयात काम करणारी तज्ञ मंडळी, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, साहित्यिक, प्रशासक, व्यावसायिक व इतर मान्यवरांशी चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहेत. या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सूचना पाठविण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसकडून करण्यात आले आहे.