चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने करण्यात येणार पुष्पवृष्टी
मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र, आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच १४ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी मान्यता दिली व त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
१४ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारी संदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्री ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे- पाटील, मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, आनंदराज आंबेडकर, डॉ. भदंत राहुल बोधी, रवि गरूड, मयुर कांबळे, महेंद्र साळवे यांसह अन्य समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार : गृहमंत्री वळसे-पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, आरोग्य नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्वक केल्या जातील. आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील. राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येतील. ज्यायोगे तयारीसाठी सर्वांना पुरेसा वेळ मिळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीची मागणी यावेळी मान्य करण्यात येऊन त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबई महापालिकेतर्फे जयंती निमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भातील माहितीचे सादरीकरण बैठकीत केले.
कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे जयंतीला येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढू शकते या धर्तीवर प्रशासनाने विविध उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने विविध सदस्यांनी केल्या.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर