December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

द्राक्षांचा टेम्पो ठाण्यात उलटला

द्राक्षांचा टेम्पो ठाण्यात उलटला

ठाणे : बाजारात पोहोचण्यापूर्वीच द्राक्ष रस्त्यावर

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर परिमाण

ठाणे

नाशिक येथून ठाण्याच्या बाजारात द्राक्षे घेऊन दाखल झालेला टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर चढल्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ उलटला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, टेम्पोसह त्यामधील द्राक्षे रस्त्याच्या मधोमध उलटल्याने महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती. तर, दुसरीकडे रस्त्यावर द्राक्षांचा खच पडल्याचे पाहण्यास मिळाले.

नाशिक मुंबई महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ टेम्पो पहाटे सव्वातीनच्या सुमारास उलटल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे वाहतुक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कोणी यामध्ये जखमी झाले आहे याची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर उलटलेल्या टेम्पो आणि त्यातील द्राक्षे बाजूला करण्याचे काम हाती घेतले. यामुळे या महामार्गावरील वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. द्राक्षे दुसऱ्या गाडीमध्ये भरण्यात आली. तर टेम्पो हा हायड्रा क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. त्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला. हा टेम्पो घेऊन चालक नितीन नवाळे हा नाशिकहुन ठाण्यात येताना रस्त्यावर उलटला.

सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. तर टेम्पोमध्ये साधारणपणे २२ क्विंटल द्राक्षे होती अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.