December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

जागर विज्ञानाचा कार्यक्रम सादर करताना शाहीर शिरसाठ

जागर विज्ञानाचा कार्यक्रम सादर करताना शाहीर शिरसाठ

जगात चमत्कार नसतात, तुम्ही समजुन घ्या रे मनी

विज्ञान असते त्याच्या मागे सांगे शाहु वाणी

संविधानिक मूल्यांच्या आधारे जागर विज्ञानाचे ३५० प्रयोग पुर्ण

कल्याण

कल्याणमधील शाहीर स्वप्निल शिरसाठ हे शाळा, महाविद्यालयात, वस्तीत जाऊन संविधानिक मूल्यांच्या आधारे जागर विज्ञानाचा कार्यक्रम घेऊन अविरतपणे प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय, वडाळा येथे शाहीर शिरसाठ यांचे ३५० वे सत्र पूर्ण झाले.

श्रध्दा, स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिलं आहे पण श्रद्धेचा गैरवापर करून जर कुणी व्यक्तींचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण करत असेल तर त्याला थांबवणे आपलं काम आहे असे शाहीर शिरसाठ सांगतात. विज्ञानयुग आलं आहे. कित्येक गोष्टी विज्ञानाच्या जोरावर शक्य होतं आहेत. विज्ञानामुळेच मानवाची प्रगती झाली आहे. पण ह्याच विज्ञानाच्या आधारावर काही मूठभर लोकांनी सर्व सामान्यांची दिशाभूल करून विज्ञानाला बदनाम करण्याचा कट रचला आहे म्हणून चमत्कारामागील विज्ञान समजुन घेणं काळाची गरज आहे.

प्रत्येक गोष्टींमागे कार्यकारणभाव दडला आहे. तो निरीक्षण, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग याप्रकारे तपासता येऊ शकतो व वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे मनात रुजण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो असे शिरसाठ यांनी सांगितले. प्रबोधनासाठी शाहीर शिरसाठ लांबचा पल्ला गाठत असतात. तीन-चार तास प्रबोधन करुन त्या सर्व लोकांना ह्या परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.

हे प्रबोधन जनमानसात पोहोचवण्यासाठी चळवळ शिवाय पर्याय नाही असे काही नाही जर तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला मूलभूत फरक समजून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात जरी डोळसपणे विज्ञान प्रमाण मानत असाल तरीही तुम्ही चळवळीचचं काम करत आहात हे लक्षात घ्यायला हवं असेही शिरसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.