December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

बांधिलकी वधूवर मेळाव्यात बोलताना मान्यवर

बांधिलकी वधूवर मेळाव्यात बोलताना मान्यवर

कल्याण : …तर आपोआप समाजाची प्रगती होते – पोलीस उपायुक्त घुगे

कल्याण

कोणत्याही समाजातील कुटुंबाने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवले व चांगल्या व्यवसाय नोकरीत आणले तर आपोआप त्या कुटुंबाची प्रगती होते. त्या कुटुंबाची प्रगती झाली म्हणजे आपोआप त्या समाजाची प्रगती होते म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी येथे मांडले.

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या बांधिलकी वधु-वर परिचय समितीच्या वतीने दुसरा वधूवर परिचय मेळावा नुकताच नूतन विद्यालय, कल्याण येथे संपन्न झाला. समितीने १०० विवाह जुळविल्याबद्दल शताब्दी पूर्ती सोहळा कार्यक्रम आणि दुसरा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त घुगे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, बबन सानप, सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

मनोहर आव्हाड यांनी आपल्या भाषणात आपण समाजाचे घेणेकरी नाही, तर देणेकरी लागतो असे नमूद करून प्रत्येकाने आपल्या समाजाचे ऋण म्हणून बांधिलकी मानून समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे नमूद केले. माजी सभापती वाघ यांनी आपल्या भाषणात समाज बांधवांनी साध्या पद्धतीने लग्न करावे व अनाठाई खर्च टाळावा. लग्नामध्ये टोपी उपरणे, शाली, फेटे असा वायफळ खर्च बंद करावा असे सुचविले. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीने ज्याप्रमाणे वधुवर मेळावे यशस्वी केले आहेत तसाच त्यांनी त्यांच्या मंडळामार्फत जमलेल्या विवाह इच्छुक जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करावा त्यासाठी लागणारी आर्थिक मदत मी करेन असे जाहीर केले.

त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांनी आपल्या भाषणात संस्थेने बांधीलकी वधूवर सूचक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केलेले निवृत्ती घुगे यांनी आपली जबाबदारी अत्यंत उत्तम रीतीने पार पाडली असून त्यांच्या पुढाकाराने आज १००  विवाह जुळलेले आहेत. ही संस्थेच्या दृष्टीने कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे असे सांगून घुगे यांचे अभिनंदन केले.

यावेळी मंडळामार्फत लग्न जुळलेल्या वधूवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे व घुगे यांचे आभार मानले. या वधूवर सुचक मेळाव्यात सुमारे २५० विवाह इच्छुक तरुण-तरुणींनी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माराम फड, रामनाथ दौंड, संग्राम घुगे, सचिन दराडे, लता पालवे, वंदना सानप, गीता दराडे, सिमरन दराडे, अनिल दौंड, किरण दराडे, ज्ञानेश्वर घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले.