December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा

गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा

कल्याण : शाळा दत्तक घेऊन तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत – केडीएमसी आयुक्त

केडीएमसीच्या वतीने ‘गुढी पाडवा प्रवेश वाढवा’ उपक्रम  

कल्याण

शाळाबाह्य मुलांनी केडीएमसीच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी केडीएमसी अधिकारी, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे उद्गार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर “गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा” या आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार आज आयुक्त डॉ. सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी डॉ. आरती यांनी स्वतः महापालिकेच्या बारावे येथील महात्मा फुले प्राथमिक विद्यालय, शाळा क्र. ६८ येथे समक्ष उपस्थित राहून १८ दाखलपात्र मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांचा उत्साह वाढविला.

केडीएमसीच्या शाळेचा पट वाढवावा आणि जास्तीतजास्त शाळाबाह्य मुलांनी महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आजचा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा प्रवेशोत्सव आहे. महापालिकेच्या ५९ शाळांमध्ये एक दिवस आपण प्रेरणा दिवस म्हणून साजरा करूया, त्याचप्रमाणे महापालिका अधिकारी यांनी महापालिकेची एक-एक शाळा दत्तक घेऊन तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत असेही ते पुढे म्हणाले.

महापालिका शिक्षक खूप चांगलं काम करीत आहे. त्यांनी आणखी झोकून देऊन तळमळीने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासमयी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त शिक्षण अनंत कदम, सचिव संजय जाधव, प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव, शाळेतील मुख्याध्यापक,  शिक्षक वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

आजच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कल्याण-डोंबिवली येथील महापालिकेच्या ५९ शाळांमध्ये महापालिका अधिकारी वर्गांने समक्ष उपस्थित राहून दाखलपात्र विद्यार्थ्यांना आज प्रवेश दिला. दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल, चॉकलेट आणि बक्षीस देऊन स्वागत केले. महापालिका शाळांमध्ये आज पुस्तकांची गुढी उभारल्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.