ढोल ताशे, लेझीम, भजनाच्या गजरात उत्सहात निघाली स्वागत यात्रा
कल्याण
कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेची १५ वर्षांची परंपरा यावर्षी देखील कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. ढोल ताशे, लेझीम, भजनाच्या गजरात स्वागत यात्रा सकाळी उत्साहात निघाली.
गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा रद्द झाल्या होत्या. यंदा सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर आज ठिकठिकाणी स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या होत्या. पूर्वेत देखील स्वागत यात्रेला पंधरा वर्षांची परंपरा आहे. आज कल्याण पूर्वेत हिंदू नववर्ष समितीच्या वतीने स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. या स्वागत यात्रेत तरुण-तरुणींचा उत्साह दिसून आला.
गणपती मंदिरापासून सुरु झालेल्या या स्वागत यात्रेची सांगता तिसाई मंदिर येथे झाली. या स्वागत यात्रेमध्ये तरुणतरुणी, नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ढोलताशे, लेझीम पथक, वारकरी, घोडयावर स्वार झालेल्या महिला, बालशिवाजी देखील या यात्रेत सहभागी झाली होती. या यात्रेत देवीदेवतांच्या वेशभूषा करून काही तरुणतरुणी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे महिला रिक्षाचालक, महिला बाईक चालक, सायकल रॅली, बाईक रॅली देखील काढण्यात आली होती.
यंदा निर्बंध शिथिल झाल्याने उत्साह आहे. मात्र, सरकारने निर्णय उशीरा घेतला, लवकर घेतला असता तर स्वागत यात्रा आणखी व्यापक प्रमाणात काढता आली असती अशी खंत यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली.
या गुढीपाडवा नवीन वर्षाच्या यात्रेत कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मोरेश्वर भोईर, विक्की तरे, मोनाली तरे, परिवहन सदस्य संजय मोरे, रिपाईचे नेते अण्णा रोकडे, केतन रोकडे, सुभाष म्हस्के, नरेंद्र सूर्यवंशी, संदीप तांबे, विजय भोसले, उमाकांत चौधरी, प्रवीण खाडे आदींसहित अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
खूप खूप आभार