December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

कल्याण

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रामक रुप घेतांना दिसतेय. आज कल्याण पूर्व येथे शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शहर शाखेसमोर मुख्य रस्तावर शिवसैनिकांनी आक्रमक होत किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ ठिय्या मांडण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, प्रशांत काळे, कैलास शिंदे, पुरषोत्तम चव्हाण, महेश गायकवाड, युवती सेना जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

युध्दनौका विक्रांत भंगारात निघु नये आणि या युध्दनौकेचं संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी किरीट सोमैय्या यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना सुपुर्त करण्यासाठी अनेक कोटी रुपये जमवले मात्र ते पैसे राजभवनाला मिळालेच नसल्याची माहिती आरटीआय मधुन उघड झाल्यानंतर यामध्ये गोळा झालेल्या निधीमध्ये सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमकतेने आंदोलन केलं.

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी कोळसेवाडी शहर शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रास्ता रोको करत ठिय्या मांडला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला. किरीट सोमय्या हे खोटे नाटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचे सत्र भाजपा कडून सुरु असून सोमय्यांनी आयएनएस विक्रांत च्या नावाने ५८ कोटी रुपये जमवून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत मुंबईमध्ये गुन्हा देखिल दाखल झाल असून किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी शिवसेना कल्याण पूर्व शहर शाखेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली.

आयएनएस विक्रांतचे जतन करण्याच्या नावाखाली संपूर्ण देशभरातून किरीट सोमय्यांनी नागरिकांना फसवून कोट्यावधी रुपये जमा केले. हि रक्कम राज्यपालांना दिली असल्याचे सांगितले. मात्र याबाबत राज्यपालांकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता अशाप्रकारे कोणतीही रक्कम जमा केली नसल्याची माहिती देण्यात आली. याच्याच निषेधार्थ आंदोलन करून किरीट सोमय्या यांना अटक करण्याची मागणी केली असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांनी दिली.