December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन

कल्याण

सुप्रसिद्ध तबला, ढोलकी वादक अशोक कदम (६०) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सहवास लाभणे, त्यांच्या गीतावर वादन करण्याची संधी मिळावी असे स्वप्न प्रत्येक कलाकाराचे असते. कल्याणमधील तबला, ढोलकी वादक अशोक कदम यांचे हे स्वप्न केवळ स्वप्न न रहाता तब्बल २५ वर्षे ते हे स्वप्न जगले. तसेच कल्याणमध्ये प्रथमेश म्युजिक अकादमी सुरु करुन अनेक हुरहुन्नरी कलाकारांना घडविण्याचे काम कदम करीत होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आदित्य – ओंकार ही दोन मुले आहेत.

कदम यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. तबला, पखवाज, ढोलकी वादनातील कौशल्यामुळे भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यासोबत काम करण्याची संधी कदम यांना मिळाली. १९९३ साली त्यांची दिदींसोबत पहिली भेट झाली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमातील अशोक यांचे वादन ऐकल्यानंतर १९९८ मध्ये अमेरिका येथील एका कार्यक्रमात लता दिदींच्या गाण्याला साथ देण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमात अशोक यांनी देश परदेशातील अनेक कार्यक्रमात दिदींना गाण्यात साथ संगत केली. लता दिदींनी आर्शिवादपर दिलेले पत्र, पाच हजाराचे रोख बक्षिस अशोक यांनी जपले होते. दिदींचे आर्शिवाद लाखमोलाचे असल्याची भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.