December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे उद्या भूमिपूजन

कल्याण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती स्मारकाचे भूमिपूजन मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते तसेच राज्यमंत्री कपिल पाटील आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ड प्रभागक्षेत्र कार्यालय परिसरात संपन्न होणार आहे.

यासाठी १३०० चौमी. क्षेत्राची जागा प्रभागक्षेत्र कार्यालयासाठी असलेल्या आरक्षणातून वगळून डॉ. आंबेडकर स्मारकासाठी पुतळा उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. या कामासाठी DPR तयार करणे कामी महापालिकेमार्फत निविदा काढून समंत्रकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. संमत्रकाने तयार केलेल्या सविस्तर आराखडयानुसार महापालिकेने ई निविदा काढून ठेकेदारची नियुक्ती केलेली आहे.

त्याअनुषंगाने या पूर्णाकृती स्मारकामध्ये तळमजल्यावर प्रदर्शन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत माहितीपट दाखविण्यासाठी थिएटर, ई- वाचनालय, मल्टीपरपज हॉल आणि पहिल्या मजल्यावरील चौथ-यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. याकामी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून महापालिकेस शासनाकडून रु ९ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे.