नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन
कल्याण
कल्याण पूर्व भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे ही मागणी गेल्या १३ वर्षापासून होती. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरीकांना सोबत घेऊन भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नगरविकास खात्यातर्फे स्मारकाला ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्ती ठरेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला मंगळवारी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्य़ास भंते महाथेरो यांच्यासह केंद्रीय मंत्री कपील पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, रिपाई नेते अण्णा रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोक गायक मिलिंद शिंदे आणि नंदेश उमप यांनी भीमगीते गाऊन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
कल्याण पूर्वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रदीर्घकाळ काळापासून केली जात होती. मात्र अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवर मात करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे विक्रमी वेळेत हे स्मारक आता प्रत्यक्षात उतरणार आहे. ज्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेची दखल संपूर्ण जगाने घेतली अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे स्मारकही तसेच भव्य दिव्य होतेय. मात्र त्याच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे आवाहनही पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करा त्यासाठीही आपण निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.
लोकसभेला उमेदवारी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र अशी ओळख होती. परंतु त्या ५ वर्षांत त्याने कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली असे सांगत पालकमंत्री शिंदे यांनी या भुमीपूजन कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर पार्लमेंटमध्ये १२५ तास चर्चा घडविली होती. तर भाजपाच्या वतीने देशभरात मंडल स्तरावर संविधान वाचन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारतामध्ये स्थिर राजवटी राहिली आहे. तर पाकिस्तानमध्ये एकही पंतप्रधान ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही, यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्त्व असल्याचे मत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
कल्याण पूर्वेतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले महामानव भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत असल्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. या स्मारक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांचे भव्य ग्रंथालय, छायाचित्रांचे दालन आणि बहुउद्देशीय भव्य सभागृह उभारले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार आणि महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य या स्मारकाच्या माध्यमातून होणार असल्याची भावनाही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.
एकीकडे सध्या भाजप आणि शिवसेनेमधील चांगलेच ताणलेले गेलेले दिसत आहेत. अगदी छोट्यात छोट्यात कारणावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र कल्याण पुर्वेत झालेला कालचा कार्यक्रम हा अपवाद ठरला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हरवलेल्या महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीयतेचे, सर्वसमावेशक राजकारणाचे सकारात्मक चित्र दिसून आले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर