December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

तर, पालिकेला ठोकणार टाळे : आमदार राजू पाटील

पाणी प्रश्नाबाबत मनसे – भाजपा एकत्र

केडीएमसीवर तहान मोर्चा  

कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील पाण्यावरून राजकारण तापले असून आज मनसे व भाजपाने एकत्र येत कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाणी प्रश्न सुटत नसेल तर खड्ड्यात गेली आमदारकी. एक दिवस महापालिकेला टाळे ठोकणार बघू मग कोण काय करतो असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला. तर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनीही सत्तेचा माज नसता तर पाणी प्रश्न पाच वर्षांपूर्वीच सुटली असती अशी पाणी प्रश्नावर प्रशासनावर प्रखर टीका केली.

२७ गावांसह महापालिका हद्दीतील पाणी प्रश्नावर आज मनसेच्या वतीने तहान मोर्चा काढण्यात आला. ज्याला भाजपनेही आपला पाठींबा दर्शवत सहभाग नोंदवला. कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉलपासून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये मनसे आणि भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केडीएमसीसह आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण पाहता, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा मनसेच्या युतीची नांदी सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी तर पालिका प्रशासनाला धारेवर धरत सत्तेचा अधिकाऱ्यांना माज आला असून ५ वर्षांपूर्वी अमृत योजना सुरु झाली. त्याचे नियोजन दोन वर्षात करणे अपेक्षित होते. मात्र केले गेले नाही जे प्रकल्प करायला पाहिजे ते करत नाही. खरं तर २०२० साली पाण्याची लाईनचे काम पूर्ण करून शहरातील पाणी प्रश्न सोडवला पाहिजे होता. मात्र या पालिका व एमआयडीसी अधिकारांच्या करंटेपणामुळे आज मोर्चा काढण्याची आमच्यावर वेळ आली आहे.

केडीएमसी मुख्यालयावर धडक दिल्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळ प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मुख्यालयात आले. परंतु या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि एमआयडीसीचे मुख्य अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. हजारो नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसी अधिकारी अजिबात गंभीर नसल्याचा घणाघात या दोघांनी केला.

तर मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, खड्ड्यात गेली ती आमदारकी. लोकांचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेणार नसेल तर आपल्याला चांगलेच महागात पडेल, आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत, प्रशासकीय इमारतीला टाळे ठोकून बाहेर उभे राहू, बघू कोण येतं ते अशा शब्दांत उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.