कल्याण
२७ गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिल्या. २७ गावातील पाणी टंचाईबाबत महापालिका मुख्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चा करतांना त्यांनी ह्या सूचना दिल्या. सदर बैठकीस महापालिकेच्या जल अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता पाटील, महापालिकेच्या पाणी पुरवठा कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, डोंबिवली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे, पाणी पुरवठा विभागाचे इतर अभियंते उपस्थित होते.
भोपर, देसलेपाडा, नांदिवली टेकडी, नांदिवली, मधलापाडा, दावडी, गोळवली, पिसवली, माणेरे, आशेळे, द्वारली या गावात पाणी टंचाईबाबतची समस्या जास्त असून ई प्रभागात दररोज ८ टँकर व आय प्रभागात दररोज ६ टँकर, प्रत्येकी ६ फे-याने पाणी पुरवठा केला जातो, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली असता पाणी टंचाईच्या आवश्यकतेनुसार त्यात वाढ करणेबाबतचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले. प्रामुख्याने भोपर,देसलेपाडा या गावांसाठी मानपाडा जंक्शन येथे तात्पुरता संप उभारुन पंपाने पाणी पुरवठा करणे, रिजन्सी अनंतम येथील संपमध्ये पंप बसविणे तसेच माणेरे गावातील सार्वजनिक विहिरींचा संप म्हणून वापर करुन तेथून पंपाने पाणी पुरवठा करणे ही कामे मंजूर झाली असून यांच्या निविदा मागविल्या आहेत, त्यामुळे ही कामे तातडीने सुरु करणेबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या आढावा बैठकीत दिले. तसेच एमआयडीसी मध्ये टँकर फिलींग करीता पिंगारा हॉटेल जवळ जागेची पाहणी करुन टँकर फिलींग पाईंट तयार करणे, एमआयडीसी फायर ब्रिगेड येथील टँकर फिलींग पाईंटला बुस्टर लावून अतिरिक्त टँकर भरण्याची व्यवस्था करणे याबाबत एमआयडीसी अधिका-यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे कल्याण विशेषत: टिटवाळा, डोंबिवली येथील चाळ, झोपडपट्टी सदृश्य परिसर अशा ठिकाणी पाहणी करुन तेथे पाण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या सिंटेक्स टाक्या बसविणेबाबतही कार्यवाही करणेबाबतचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नागरिकांना पुरविण्यात येणा-या टँकर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर जीपीएस सिस्टिम बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी यावेळी उपस्थित अधिका-यांना दिले.
एमआयडीसीच्या अधिका-यांना २७ गावांत कमीत कमी ०.८० च्या प्रेशरने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्तांनी या बैठकीत यावेळी दिले व एमआयडीसीच्या अधिका-यांनी त्यास सहमती दर्शविली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर