April 11, 2025

news on web

the news on web in leading news website

भारतातील पहिले बुकमार्क प्रदर्शन डोंबिवलीत

डोंबिवली

पुस्तके वाचताना त्याची नीट हाताळणी व्हावी या उद्देशातून डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त येथील सर्वेश सभागृहात दोन दिवसीय भव्य पुस्तक बुकमार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

घरातील टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले विविध आकर्षक असे ९४० बुकमार्क नागरिकांना पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. हे अनोखे प्रदर्शन भारतातले पहिले आहे, असा दावा लायब्ररीकडून करण्यात आला आहे.

पै फ्रेंड्स लायब्ररीने पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच पुस्तक हाताळताना बुकमार्कचा वापर केला पाहिजे. या हेतूने यंदा जागतिक पुस्तक दिनानिमित्त आगळेवेगळे बुकमार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यासाठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या लायब्ररीने जागतिक स्तरावर बुकमार्क स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांसह बंगळूर, दिल्ली, गुजरात, पुणे, नागपूर या भागांमधून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

घरातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ, लग्नपत्रिका, जाहिरातींचे खोके, रंगीबेरंगी कापड, झाडांची पाने, फुले यांपासून स्पर्धकांनी विविध आकर्षक असे सुमारे ९४० बुकमार्क तयार करून लायब्ररीमध्ये पाठविण्यात आली.

पुस्तक प्रदर्शन आणि विक्री

२३ एप्रिल, जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून पै फ्रेंड्स लायब्ररीने २३ आणि २४ एप्रिल दोन दिवसीय पुस्तक बुकमार्क प्रदर्शनाबरोबरच पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील कथा, कादंबरी, ललित, चरित्रपर, शेअर मार्केट अशा विविध विषयांतील सुमारे ५० हजार पुस्तके वाचकप्रेमींसाठी उपलब्ध असणार आहेत.