December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

वाहन चालकांनाच नियमांबाबत जनजागृती करण्याची शिक्षा

कल्याण

एकीकडे रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि शासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. परंतु त्यानंतरही नागरिक काही एकायचे नाव घेत नसल्याने अखेर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडूनच पोलिसांनी जनजागृती करत वेगळी शिक्षा दिलेली पाहायला मिळाली. कल्याणच्या दुर्गामाता चौकात वाहतूक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवला. ८०० ते १००० लोकांना समुपदेश करत जनजागृती मोहिमेत सामील करण्यात आले.

सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे असे प्रकार वाहन चालक सर्रासपणे करत असल्याचे दिसतात. वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अखेर वेगळ्या पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांच्या हाती दंडाचे चलान न देता वाहतूक नियम पाळण्याबाबत संदेश देणारे बॅनर हातामध्ये देऊन १५ मिनिटे उभे राहण्याची शिक्षा करण्यात आल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. त्यानुसार अनेक वाहन चालक हातामध्ये नियम पाळण्याचे संदेश घेऊन भर उन्हात उभे राहिलेले दिसून आले. किमान या शिक्षेनंतर तरी आता नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील अशी अपेक्षाही वाहतुक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सिग्नल जंपिंग मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात तसेच हेल्मेट व सिटबेल्ट न वापरल्याने अपघातातील मृत्यूचे प्रमाण ७०% पर्यंत वाढते. यासाठी कल्याण वाहतुक उपविभागीच्या हद्दीत विविध ठिकाणी विशेष तपासनी मोहीम दुर्गाडी चौक, पत्री पूल, शहाड नाका, प्रेम आटो आदी ठिकाणी राबवत ८०० ते १००० लोकांना समुपदेशन करून जनजागृती मोहिमेमध्ये सामील करून घेण्यात आले. ज्या वाहन धारकाला जनजागृती साठी आपले योगदान द्यायचे नाही त्यांचेवर ई चलानच्या माध्यमातुन ५५ वाहनचालकांवर मोटारवाहन कायद्याच्या उल्लंघनाबाबत कार्यवाही करुन तात्काळ दंड वसूल केला असल्याची माहिती महेश तरडे यांनी दिली.