December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मेणबत्तीच्या उजेडात आमची होतेय अशी अवस्था

वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा

कल्याण

वाढत्या उकाडय़ात रात्री नागरीकांच्या झोपेचे खोबरे करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विरोधात शिवसैनिकांनी कल्याणमधील तेजश्री वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी अधिकाऱ्यांच्या दालनात मेणबत्त्या पेटवून चर्चा केली. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अधिकारी वर्गास दिला.

शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह मलंगगड परिसरातील विभाग प्रमुख चैनू जाधव, उपसभापती तेजश्री जाधव यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चात महिला वर्ग मोठया संख्यने सहभागी झाला होता. त्यात लहान मुलेही सहभागी झाली होती. माजी नगरसेवक गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी मलंगगड परिसरातील खंडीत वीज पुरवठा प्रकरणी अधिकारी वर्गाला निवेदन देऊन पुरवठा सुरळित केला जावा अशी मागणी केली होती. त्याची अधिकारी वर्गाने दखल घेतली नाही. त्यानंतरही वीज पुरवठा खंडीत होत राहल्याने संतप्त शिवसैनिकांनी आज वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले.

अभियंते दीपक पाटील यांचे दालनात प्रवेश केला. पाटील यांच्या कार्यालयातील वीजेचे दिवे बंद करण्यात आले. शिष्ट मंडळाने पाटील यांच्या दालनात चक्क मेणबत्त्या पेटवून मेणबत्यांच्या उजेडात चर्चा केली. अंधारात मेणबत्तीच्या उजेडात नागरीकांची काय अवस्था होते याची अधिकारी वर्गास जाणीव व्हावी यासाठी मोर्चेकऱ्यांनी मेणबत्त्या पेटविल्या होत्या. यावेळी, पोलिसांनी या मेणबत्त्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही मंडळींनी पेटलेल्या मेणबत्त्या पोलिसांना देण्यास नकार दिला. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.