The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुषांच्या रग्बी स्पर्धेत पंजाब विद्यापीठ प्रथम

कल्याण

बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण आणि मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ रग्बी स्पर्धा १२ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील चाळीस विद्यापीठातील पाचशेहून अधिक पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या चार दिवस चाललेल्या पुरुषांच्या रग्बी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या रग्बी खेळाडूंना कडवी स्पर्धा देत चंदीगड विद्यापीठ, मोहालीच्या संघाने १५ खेळाडूंच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या दोन विद्यापीठांचा अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला.

दुसरीकडे, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाबने सात खेळाडूंच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला, तर याच खेळात कालिकत विद्यापीठ, केरळच्या लढाऊ खेळाडूंना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, मुंबई, डॉ. नरेश चंद्र, शिक्षण संचालक बिर्ला महाविद्यालय, कल्याण, सुबोध दवे, उपाध्यक्ष, व्यवस्थापन समिती, बी. के बिर्ला कॉलेज, कल्याण, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, उपप्राचार्य डॉ. स्वप्ना समेळ, नाईट कॉलेजचे प्राचार्य व संयोजक डॉ. हरीश दुबे आणि प्रा. यज्ञेश्वर बागराव आदी मान्यवरांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

खेळाच्या शेवटी सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षिसे देण्यात आली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, देशाच्या समृद्धीसाठी खेळाची भावना अत्यंत उपयुक्त आहे, तसेच खेळाला शिक्षणाचा प्रमुख भाग बनविण्याबाबत सांगितले. डॉ. नरेश चंद्र यांनी खेळाडूंच्या धाडसाचे कौतुक करताना आणि रग्बीमध्ये जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण करण्याच्या गरजेवर भर देताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अनिल तिवारी यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण या वर्षी (२०२१-२२) आपल्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त आयोजित या स्पर्धेने सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. पुरुषांसाठी अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ रग्बी स्पर्धा एका भव्य समारोप समारंभाने संपन्न झाली. पंजाब विद्यापीठ चॅम्पियन म्हणून उदयास आले आणि मुंबई विद्यापीठ उपविजेते ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *