सीसीटीव्हीच्या सहाय्याने ठोकल्या दोन जणांना बेड्या
डोंबिवली
खाकरा तयार करणाऱ्या एका वयोवृद्ध व्यापाऱ्याच्या कारखान्यात येऊन त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पैसे घेऊन पळून गेलेल्या दोघा लुटारूना मानपाडा पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी या व्यापाऱ्यासोबत खाकरा ऑर्डर घेत होता.
गांगजी घोसर (६२) हे खाकरा तयार करण्याचा कारखाना चालवितात. १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास खाकऱ्याची ऑर्डर देण्यासाठी जयभद्रा हा तरुण त्यांच्या कारखान्यात आला. त्याने काही पैसे दिले. त्यावेळी घोसर हे घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी त्यांच्या जवळील ३५ हजार रुपये एका काळ्य़ा रंगाच्या पिशवीत ठेवले. याच दरम्यान एक अनोळखी इसस आला. त्याने त्याच्या हातातील मिरची पूड घोसर यांच्या डोळयात टाकली. चाकूचा धाक दाखवित त्यांच्या हातातील रोकडची पिशवी घेऊन पसार झाला.
लूटणारा तरुण हा जाता येताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी तपास सुरु केला. पोलिसांचा जयभद्रा याच्यावर संशय होता. कारण की त्याने पैसे दिल्यावर हा प्रकार घडला होता. जयभद्राला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने कबूली दिली. त्याने सांगितलेल्या माहितीनंतर या प्रकरणातील लूटारू जितेंद्र जोशी याला अटक केली. जयभद्रा आणि जितेंद्र जोशी यांनी संगनमत करुन घोसर यांना लूटले होते.
या दोघांनी यापूर्वी असा प्रकार केला आहे का याचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर