December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मुलांना वाचनाकडे वळविण्यासाठी सार्वजनिक वाचनालयाचा पुढाकार

कल्याण

मुलांनी वाढता स्क्रीन टाईम कमी करून वाचनाकडे वळावे असे प्रतिपादन अनघा राजेंद्र देवळेकर यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याणने जागतिक पुस्तक दिनानिमित्त “चला गोष्टी ऐकुया” या बाल शिबिराचे उदघाटन करताना केले.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त तरुण वर्गाला प्रोत्साहन देण्याकरिता सार्वजनिक वाचनालयात बालपणापासून ते तरुण वयातही अविरत, निरंतर वाचन संस्कृती जपणाऱ्या सोहा खिसमतराव, ईशान मोडक, मुकुल आव्हाड या वाचकांना प्रशांत शिंदे व अनघा देवळेकर यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.

या तरुण वर्गाला वाचनाचा आदर्श समोर ठेऊन भावी पिढी वाचनाकडे वळावी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी याकरिता २३ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत “चला गोष्टी ऐकुया” या बालशिबिरामुळे बालकांच्या हातातील मोबाईल काही काळासाठी का होईना दूर करून त्यांच्या हाती पुस्तक देण्याचा व त्यांच्या मधील वाचन संस्कृती वाढविण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक वाचनालय कल्याणचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.

या शिबिरामुळे मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी बाल शिबिराचे प्रा. ऋता खापर्डे, प्राची गडकरी, प्रा.जितेंद्र भामरे, रंगकर्मी सुधीर चित्ते, प्रवीण देशमुख, स्वाती नातू, दीपश्री इसामे, मीना गोडखिंडी हे मार्गदर्शन करीत असून शिबीर प्रमुख करुणा कल्याणकर व ग्रंथपाल गौरी देवळे उपस्थित होत्या.