December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कलात्मक विद्युत रोषणाईने रंगला कल्याणमधील ओक टॉवर

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरात ठिकठिकाणी कायापालट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण- डोंबिवली नगरीमध्ये विविध ठिकाणी सौदर्यीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

यामध्ये कल्याण पश्चिम येथील प्रभाकर ओक टॉवर येथे विद्युत रोषणाई करण्याच्या कामाचे लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये सीनियर वॉल वॉश लाईट, राऊंड स्पॉट लाईट,लाइटिंग कॅन्‍सोल या अद्ययावत लायटिंग सामुग्रीचा वापर करण्यात आलेला असून मंगलोर मधील कॅनरा लायटिंग कंपनीने हे फसाड लायटिंगचे (कलात्मक विद्युत रोषणाई) काम केले आहे.

सुमारे ६६ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ओक टॉवरचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून येथे नेत्रसुखद अशी विद्युत रोषणाई केली असल्याची माहिती यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. यामध्ये कल्याण परिसरात साज-या होणा-या विविध सणांच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक लाईटिंग केली जाणार असून त्यामुळे शहरातील सौंदर्य वाढेल व या नेत्रसुखद विदयुत रोषणाईंचा आनंद नागरिकांना उपभोगता येईल.

यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दुर्गाडी चौक ते भवानी चौक रस्त्यापर्यंत तिरंगा एलईडी रोषणाई कार्यान्वित करण्यात आली होती. आता कल्याण पश्चिम बरोबरच कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या परिसरातही एका मुख्य रस्त्यावर तिरंगा थीममध्ये विद्युत रोषणाई करण्याचा महापालिका आयुक्त यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने शहरातील सौंदर्यीकरणासाठी काही कामे आपल्या शहरातील विकासकांकडून सीएसआर फंडातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी विकासक मे. रॉय रेसिडेंसी प्रा.लि., मे. साकेत ग्रुप, मे. गोपालकृष्ण डेव्हलपर्स, मे. डावखर इन्फ्रास्ट्रक्चर, मे. अमेया एंटरप्राइजेस, मे. शिवोम एंटरप्राइजेस, मे. साईसृष्टी कन्स्ट्रक्शन यांच्या सोबत बोलाविलेल्या बैठकीतील चर्चेनुसार संबंधित विकासकांनी कल्याण पूर्व येथील पूना लींक रोड वरील वरील तिरंगा रोषणाईचे काम सीएसआर फंडातून करून दिले.

या नयनरम्य तिरंगा रोषणाईचे लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व इतर अधिकारी उपस्थित होते. या विदयुत रोषणाई केलेल्या पथदिव्यांच्या पोलवर नागरिकांनी पोस्टर्स, बॅनर्स लावू नयेत व महापालिकेने साकारलेल्या सौंदर्यीकरणाचे जतन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.