कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी, कल्याण डोंबिवली नगरी प्रदुषणमुक्त व्हावी आणि महापालिकेच्या नागरिकांचे शारिरीक स्वास्थ सुदृढ रहावे या दृष्टीकोनातून महापालिका क्षेत्रात सायकल संस्कृती रुजविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली त्यांचे दालनात कल्याण मधील सायकल प्रेमी, महापालिका अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी यांचे समवेत नुकतीच बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत महापालिका क्षेत्रात सायकल संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीकोनातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. त्यानुसार शहरात सायकल वाहतूकीसाठी कायम स्वरुपी मार्गिका उपलब्ध करुन देणेबाबत नियोजन आराखडा तयार करणेबाबतचे निर्देश शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांना देण्यात आले. तसेच शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या पार्किंगमध्ये सायकलसाठी २५ टक्के आरक्षण उपलब्ध करून देणेबाबत आणि स्टेशन परिसरात सायकल साठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे बाबतची कार्यवाही करण्याबाबत मालमत्ता विभागाचे उपायुक्त पल्लवी भागवत यांस निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली शहरात दरवर्षी प्रभाग निहाय सायकल रॅलीचे व मुख्यालय स्तरावर ३ जून या आंतरराष्ट्रीय सायकल डेच्या दिवशी सायकल महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शहरातील जे नागरिक नियमित स्वरुपात सायकलचा वापर करतात त्यांचा पर्यावरण दूत म्हणून गौरव करण्यात येणार आहे. तसेच जे विदयार्थी शाळा, महाविदयालयांमध्ये नियमित स्वरुपात सायकल वापर करतील त्यांचाही पर्यावरण दूत म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नियमित सायकल वापर करणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना देखील पर्यावरण दुत म्हणून गौरविण्यात येईल आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील ज्या अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात येण्यासाठी सायकल वापर करणे शक्य आहे, त्यांनी नियमितपणे सायकलचा वापर करावा किंवा निदान आठवडयातून एकदा दर मंगळवारी सायकलवरुन कार्यालयात यावेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच सायकल वापरासाठी प्रोत्साहन देणा-या शहरातील संस्थांना पर्यावरण पालक म्हणून गौरविण्यात येईल.
सायकल शिकू इच्छणाऱ्या शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांना सायकल शिकण्यासाठी स्वतंत्र मैदाने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्षी शहरामध्ये सायकल वापरामध्ये किती वाढ झाली व त्या अनुषंगाने नेट झिरो, कार्बन क्रेडीट याची नोंद ठेवली जाईल.
या उपक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून प्रशांत रा. भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत) यांची नेमणूक करण्यात आली असून शहरातील ज्या रहिवाश्यांकडे विनावापर सायकल पडून असतील त्यांनी त्या सायकली महापालिकेकडे दान कराव्यात तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रशांत रा. भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत) संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 9821115678 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर