कल्याण
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागत असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश कदम यांच्या नंतर लागलेली गळती अजूनही सुरू आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. कुणालाही विचारात न घेता काम करणे, सातत्याने विकास कामांना विरोध करणे, इतरांना काम करण्याची संधी न देता त्यांना डावलणे, मत मांडण्याचा अधिकार न देणे अशा गोष्टी होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात मोठमोठे नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत आहेत. डोंबिवलीचे तत्कालीन मनसे शहर प्रमुख राजेश कदम यांनी याच दृष्टीतून मनसेला रामराम केला.
त्यांच्या नंतर सागर जेधे, अर्जुन पाटील यांच्या सारख्या पदाधिकाऱ्यांनी मनसे सोडली. काटई, उसरघर परिसरातील माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील यांनी शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत मनसेचे तालुका प्रमुख आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन पाटील यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसेचे सचिव प्रकाश माने आणि विद्यार्थी सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, मनसेचे राज्यातले एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या राहत्या घराच्या प्रभागातच हा धक्का बसला आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर