December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केरळमधील टोमॅटो तापाचा पालकांनी घेतला धसका

मुंबई 

केरळमधील ५ वर्षाखालील मुलांमध्ये टोमॅटो तापाची लागण होत आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूर सारख्या भागात अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळच्या आरोग्य विभागाने राज्यभर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या ८२ रुग्णांची नोंद झाली असून, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांची संख्या वाढू शकते. या टोमॅटो फ्लू ने मुंबई व जवळच्या शहरातील पालकांची झोप उडवली असून अनेक पालक हे डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथिल अपेक्स हॉस्पिटलचे बालरोग व नवजात तज्ञ डॉ. कौस्तुभ शहा म्हणाले, “कोरोना महामारीनंतर आलेल्या या टोमॅटो तापाने पालकांची झोप उडवली आहे. मुख्यतः या टोमॅटो तापाची लक्षणे आपल्याकडे पावसामध्ये लहान मुलांना होणाऱ्या आजाराशी साम्यता आहे. केरळमध्ये आढळलेला टोमॅटो फ्लू हा विषाणूजन्य संसर्ग असून हात, पाय, तोंडाला ( हॅन्ड फूट व माऊथ ) पुरळ येऊन ताप येतो, सर्वसाधारण ५ वर्षांखालील मुलांना याचा संसर्ग होतो परंतु ७ ते ८ वर्षांवरील मुलांमध्ये सुद्धा हि लक्षणे आढळून येतात या फोडांचा आकार सामान्यतः लाल असतो म्हणून त्याला टोमॅटो फ्लू असे नाव दिले आहे. वैद्यकीय भाषेत टोमॅटो फ्लू हे व्हायरल इनफेक्शन आहे की चिकनगुनिया किंवा डेंग्यूच्या संसर्गामुळे होते हे सांगणे कठीण आहे. मुंबईत गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळून आले होते परंतु यांची संख्या फार कमी होती तसेच त्यावेळी कोरोना महामारीची दहशत नव्हती परंतु आता कोरोनानंतर कुठल्याही संसर्गजन्य आजाराची पालकांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी हा आजार आपल्याकडे नव्हताच. दुसऱ्या देशातून याचे विषाणू भारतात आल्याने गेल्या सात-आठ वर्षांपासून याचे रुग्ण आढळून येत आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून येणारा या आजाराची लागण या अगदी नऊ वर्षांच्या मुलांनाही झाल्याचे पाहण्यात आले. त्यामुळे अंगावर तसेच मुख्यतः हात पाय व तोंड तर कधी कधी तोंडामध्ये पुरळ आले तर लगेच वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन घेणं महत्वाचे आहे. अनेकवेळा हा पुरळ म्हणजे कांजण्याची लक्षणे आहेत असा गैरसमज पालकांचा होतो.”

या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसून योग्य ती काळजी घेतल्यास हा जर १० दिवसात बरा होतो, अशी माहिती बालरोग व नवजात तज्ञ डॉ. कौस्तुभ शहा यांनी दिली तसेच तरी सध्या मुंबईत अशा रुग्णांची नोंद झालेली नाही.