December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पै फ्रेंड्स लायब्ररीचा अभिनव उपक्रम

 १०५१ सभासद नोंदणीचा विश्वविक्रम करण्याचा उपक्रम

 

‘पुस्तके आपले खरे मित्र’, ‘वाचाल तर वाचाल’ ही वाक्ये आपण अनेकदा ऐकत असतो. पण लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वाचन करावं किंवा एकूणच सर्वच वयोगटातील लोकांना वाचनाची आवड लागून अनेक पिढ्या समृद्ध व्हाव्यात हा ध्यास मनी घेऊन २२ मे १९८६ साली पै फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना झाली. जवळपास ४ दशके आणि तीन तपे पै फ्रेंड्स लायब्ररी ही वाचकांच्या सेवेत रुजू आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई ते अगदी पुण्यापर्यँत अनेक सभासद पै फ्रेंड्स लायब्ररी मार्फत गेल्या ३६ वर्षांत जोडले गेले आहेत.

पुस्तके ही आयुष्यात जगण्यासाठी माणसाला खूप मोठी प्रेरणा देतात. याच प्रेरणेतून प्रेरित होऊन पै फ्रेंडस लायब्ररीची सुद्धा स्थापना झाली. एक पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने दिवसरात्र जागून काही महिने किंवा वर्ष खर्ची घातलेली असतात आणि याच लेखकांतर्फे लिहिलेले सर्व साहित्य पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचे काम हे प्रकाशक करत असतात. आता आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्म मार्फत किंवा कुठल्यातरी ऍपच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुस्तके वाचू शकतो. पण हातात घेऊन एखादे पुस्तक वाचण्याची मजा काही औरच आणि ही आवड अनेक वाचकांच्या मनात निर्माण करण्याच महत्वपूर्ण कार्य पै. फ्रेंड्स लायब्ररीने केलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पुस्तके घेऊ शकता पण आजच्या धावपळीच्या युगात शक्य नसेल तर ऑनलाईन पुस्तके सुद्धा मागवू शकता. आता काही जणांना ऑनलाइन गोष्टी जमत नाहीत ती मंडळी फोनवरून सुद्धा पुस्तके उपलब्ध करून घरपोच मागवू शकता.

मागच्या वर्षी कोणीतरी फेसबुकवर पुस्तकांच चॅलेंज घेतलं होतं त्यात आपण वाचलेल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पोस्ट करून २ व्यक्तींना रोज टॅग करायचं, असे ७ मुखपृष्ठ ७ दिवस पोस्ट करायचे. त्या निमित्ताने कळलं की कोण कुठल्या प्रकारची आणि किती पुस्तके वाचतं. लॉकडाऊनच्या काळात तर खूप पुस्तके वाचून झाली कधी कधी तर अगदी १ ते २ दिवसांत एक एक पुस्तक वाचून काढलं आहे. मला असं वाटतं की जसं नाटक हे सिनेमा, सिरीयल किंवा आत्ताच्या वेब सिरीज पेक्षा अभिनयाचं सगळ्यात लाईव्ह आणि जिवंत माध्यम आहे. तसंच पुस्तक वाचणं हे आपल्या कल्पना आणि मनातील कोरीव प्रसंगांना डोळ्यासमोर उभं करण्याचं सगळ्यात लाईव्ह माध्यम आहे. एखादं पुस्तक किंवा कुठलाही कथासंग्रह हातात घ्या. तो वाचताना त्यातल्या घडणाऱ्या घटनांची किंवा दृश्यांची मनोमन कल्पना करताना आपण त्यात हरवून जातो आणि तितकीच आपली कल्पनाशक्ती अधिकाधिक सशक्त आणि तयार होत असते.

सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की मी पुस्तकं वाचतोय किंवा मी पुस्तकं वाचून काढली आहेत पण पुस्तके वाचण ही एकतर्फी क्रिया नसून ती दोन्हीकडून होत असते असं मला वाटतं. आपण पुस्तकं वाचत असताना एकीकडे पुस्तकं सुद्धा आपल्याला वाचत असतात आणि पुस्तकात असलेले विचार आपल्यापर्यंत देऊन ते आपल्या मनातील एका समजुतीबद्दल पक्क्या असलेल्या भावना बदलण्याचा आणि आपलं अंतरंग आणि व्यक्तिमत्वच बदलत असतात. पुस्तके ही आरशासारखी असतात त्यांचे विचार किंवा सत्य समोर ठेवतात. ती कधीच आपली फसवणूक करत नाहीत किंवा मुत्सद्दीपणाने सुद्धा आपल्याशी वागत नाहीत. Every Book has tale to tell.. म्हणून पुस्तकं ही नेहमीच सच्चे मित्र असतात.

तर येत्या रविवारी म्हणजेच २२ मे २०२२ रोजी वाचकांच्या मनात वाचनसंस्कृती रुजवणाऱ्या पै फ्रेंड्स लायब्ररीला तब्बल ३६ वर्षे म्हणजेच एकूण ३ तप पूर्ण होत आहे. या निमित्ताने वाचनाची आवड असलेल्या एकूण १०५१ नवीन वाचकांची सभासद नोंदणी करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे तर आपण सर्वांनीच पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या या विक्रमी स्तुत्य उपक्रमात मोलाचा सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सभासद व्हा आणि वाचनप्रवासाला नव्याने सुरवात करा.

 

आनंद अरुण लेले