December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

स्टील चोरी करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी केला पर्दाफाश

डोंबिवली

बांधकाम व्यावसायिक यांच्या इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा अपहार करून भंगार व्यावसायिकांना स्टील विकणाऱ्या आणि बांधकाम व्यवसायिक व स्टील व्यापारी यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश करुन सात जणांना अटक केली. २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून यामध्ये चीप, रिमोट, मोबाईल, ट्रक, स्टील या मालाचा समावेश आहे. दरम्यान संपूर्ण भारतात अशा पद्धतीने स्टील विक्रीत चोरी होत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

वाशीम जिल्ह्यातील रहिवासी वाहन चालक नितीन दत्ता चौरे, माल विकत घेणारा शिवकुमार उर्फ मिता गीलई चौधरी, टागोर नगर विक्रोळी येथे राहणारा वाहन मालक दिदिरसिंग राजू, वाहन मालक व चालक दीलबागसिंग गील, गाडी मालक हरविंदरसिंग तुन्ना, मुंब्रा येथील रहिवासी आणि इलेक्ट्रोनिक चीप बसवून फसवणूक करणारा फिरोज शेख, अमृतसर पंजाब येथील वाहन चालक हरजींदरसिंग राजपूत या टोळीला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तर दिल्ली येथे राहणारा आणि चीप बनवणारा मुख्य आरोपी मानसी सिंग याचा शोध सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

जालना, नागपूर, रायगड जिल्ह्यातील वडखळ आणि अमरावती येथून इमारती बांधणीसाठी लगणारे स्टील विकत घेतले जाते. कंपनीकडून हे स्टील विक्रीसाठी बाहेर पडताना एक वजनकाटा असतो. जालना येथील स्टील कंपनीत ट्रकमध्ये माल भरताना मोजमापासाठी ठेवणाऱ्या याच वजनकाट्याला चीप लावण्यात आली. ही चीप लावल्यानंतर त्यात रीमोट कंट्रोलद्वारे वजन काट्याचे नियंत्रण करण्यात येत असे. त्यामुळे आहे त्या वाजनापेक्षा ५ टन माल काढून तो भंगारवाल्याला विक्री केल्यानंतरही वजन काट्यावर तितकंच वजन भरत असल्याने कोणालाही संशय येत नव्हता. विशेष म्हणजे मेंटेनन्सच्या नावावर ही टोळी कंपनीच्या आतमध्ये जाऊन चीप वजन काट्यामध्ये बसवत असे.

डोंबिवली येथील रीजेंसी परिसरात सुरू असलेल्या एका साईटवरील कामगारांच्या हा घोळ लक्षात आला. त्यामुळे स्टील चोरी होत असल्याची तक्रार त्यांनी मानपाडा पोलिसांकडे नोंदवली होती. त्यानुसार शोध घेऊन मानपाडा पोलिसांनी या सगळ्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीने भारतात अजून किती ठिकाणी अशा चीप लावल्या आहेत याचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस सहाय्यक आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.