अंबरनाथ
अंबर भरारी, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित सातव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी अंबरनाथ पूर्व येथे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सात वर्षांपूर्वी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष आणि कलासक्त व्यक्तिमत्व सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ मधल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असलेला अंबर भरारी या WA ग्रुपची स्थापना झाली. अनेक उपक्रमांच्या आयोजनाला सुरुवातही झाली.
याच वेळेस मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संवाद लेखक महेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सुनील चौधरी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
नगरपालिका क्षेत्रामध्ये एवढ्या भव्य प्रमाणात साकार होणारा हा चित्रपट महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने ही हा चित्रपट महोत्सव साकारण्यासाठी मोलाचे सहकार्य देऊ केले. सुरुवातीला छोटेखानी स्वरूपात झालेला हा महोत्सव पुढे जवळजवळ आठ ते दहा हजार रसिकांच्या साक्षीने साकारला गेला.
चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांची मांदियाळी महोत्सवाला आपणहून आवर्जून येऊ लागली. आजपर्यंत सुमारे दीड हजाराहून अधिक कलाकार तंत्रज्ञ, निर्माते यांनी महोत्सवाला आपली उपस्थिती लावली आहे.
निष्पक्ष निकाल आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यामुळे महोत्सवाची कीर्ती व्याप आणि पसारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चित्रपटसृष्टी मध्ये महोत्सवाला एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
कोरोनासारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा सर्व बंधने पाळून साजरा झाला.
रविवार दिनांक २९ मे रोजी रोटरी कम्युनिटी हॉल, अंबरनाथ पूर्व इथे संध्याकाळी ठीक सहा वाजून तीस मिनिटांनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “पावसाची संभाव्य” शक्यता लक्षात घेऊन बंदिस्त सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर