डोंबिवली
प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रेयसीला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास देऊन ठार मारणाऱ्या प्रियकराने त्याच दोरीच्या साह्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कल्याण-शिळ मार्गावरील एका उच्चभ्रू वस्तीत घडली.
अनिल मधुकर साळुंखे (३३, रा. नाशिक) असे या तरुणाचे नाव आहे. तर ललिता सुरेश काळे (२८) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ती कल्याण-शिळ मार्गावरील उच्चभ्रू लोकवस्तीतील बिल्डींगमध्ये राहत होती.
ललिताशी अनिलचे सुमारे नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, ललिताने दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तिचा कुंकवाचा कार्यक्रमही गुरुवारी पार पडला होता. याची कुणकुण लागताच अनिलने शेवटचे भेटण्यासाठी येत असल्याचे सांगून नाशिकहून तो थेट ललिताच्या घरी गेला. रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्याने बेडरूममध्ये झोपलेल्या ललिताच्या गळ्याभोवती नायलॉन दोरी करकचून आवळली. त्यानंतर त्याने उशीच्या साह्याने तिचे नाक-तोंड दाबले. ललिता मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर अनिल याने ज्या दोरीने ललिताचा गळा आवळला त्याच दोरीच्या साह्याने स्वतःही तेथील छताच्या फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.
ललिताच्या बहिणीने सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने बिल्डिंगच्या सिक्युरिटी आणि शेजाऱ्यांच्या मदतीने बंद दरवाजा तोडला. तेव्हा बेडरूममधील दृश्य पाहून सर्वच भयभीत झाले. या संदर्भात मृत ललिताची लहान बहीण हिच्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुरेश डांबरे करत आहेत.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर