December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी क्षेत्रात १२ लाख ३९ हजार १३० मतदार

केडीएमसी निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध

कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात आणि प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयात या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे प्रभारी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तर कल्याण-डोंबिवली क्षेत्रात ३१ मे २०२२ पर्यंतच्या मतदार यादीनुसार १२ लाख ३९ हजार १३० मतदार आहेत. त्यापैकी ६ लाख ६१ हजार पुरुष तर ५ लाख ७६ हजार महिला मतदार आहेत. तर इतर मतदारांची संख्या ३७४ इतकी आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून ही प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३१ मे २०२२ पर्यंतच्या विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी २३ जून ते १ जुलै पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मतदारांचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेचे यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे, मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका दुरुस्त करणे याच स्वरूपाच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर एक आठवड्याने म्हणजेच ९ जुलै २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक विभागाचे संकेतस्थळ  http://kdmcelection.com यावर देखील हि मतदार यादी पाहता येणार आहे. ३१ मे २०२२ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकुण मतदारांची संख्या १२ लाख ३९ हजार १३० इतकी असून सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये त्रि-सदस्यिय ४३ प्रभाग व ४ सदस्यिय १ प्रभाग असे एकुण ४४ प्रभाग असतील अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त निवडणूक सुधाकर जगताप, परिमंडळ -१ चे उपआयुक्त धैर्यशिल जाधव, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.